Kolkata Rape and Murder: कोलकातामधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर (Kolkata Rape and Murder) देशभरात संतापाची लाट आहे. यानंतर डॉक्टरांना रुग्णालयात सुरक्षा देण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यान तिरुपती येथे रुग्णाने महिला डॉक्टरवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SVIMS) येथील घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, रुग्ण महिला डॉक्टरचे केस पकडतो आणि त्यानंतर तिचं डोकं हॉस्पिटल बेडच्या स्टील फ्रेमवर आपटतो. यानंतर वॉर्डमधील इतर डॉक्टर महिला सहकाऱ्याच्या मदतीसाठी धाव घेतात. ते रुग्णाला पकडून बाजूला नेतात. 


एसव्हीआयएमएसचे संचालक आणि कुलगुरू डॉ आरव्ही कुमार यांना लिहिलेल्या पत्रात इंटर्नने सांगितले की, "ती शनिवारी आपत्कालीन औषध विभागात कर्तव्यावर होती. माझ्यावर एका रुग्णाने अनपेक्षितपणे हल्ला केला. बंगारू राजू हा मागून धावत माझ्याजवळ आला, त्याने माझे केस ओढले आणि एका खाटेच्या स्टीलच्या रॉडवर जबरदस्तीने माझे डोके आपटायला सुरुवात केली". यावेली आपल्या मदतीसाठी तिथे कोणतेही सुरक्षा कर्मचारी उपस्थित नव्हते असंही तिने नमूद केलं आहे. 



या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली असल्याचंही तिे म्हटलं आहे. "जर रुग्णाकडे धारदार शस्त्र असतं तरपरिस्थिती गंभीर होऊ शकली असती," असं ती म्हणाली आहे. तिने कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा उपायांची मागणी केली आहे. दरम्यान या घटनेनंतर सुरक्षेची मागणी करत रुग्णालयातील डॉक्टरांनी आंदोलन केलं. 


कोलकाता येथील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या काही आठवड्यांनंतर आंध्र रुग्णालयातील ही घटना घडली आहे. 31 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली आणि अनेक प्रमुख संस्थांचे डॉक्टर कामाच्या ठिकाणी त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले.


सुप्रीम कोर्टाने आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि हिंसाचार रोखण्यासाठी 10 सदस्यीय नॅशनल टास्क फोर्सची स्थापना केली आहे. ही समिती कोर्टाकडे शिफारसी सादर करणार आहे.