कुत्र्याला कारमध्ये बंद करुन कुटुंब ताजमहाल पाहायला गेलं; परत आल्यानंतर बसला धक्का; माशाप्रमाणे तडफडत त्याने....
सोशल मीडियावर (Social Media) एका पाळीव कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत कुत्रा कारमध्ये मृतावस्थेत पडलेला दिसत आहे. यानंतर त्याच्या मालकांवर टीकेची झोड सुरु असून संताप व्यक्त केला जात आहे.
ताजमहाल (Taj Mahal) पाहायला जाताना कारमध्ये बंद करत साखळीने बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कुटुंब ताजमहाल पाहायला आलं असता त्यांनी कुत्र्याला कारमध्येच ठेवलं होतं. कुटुंबाने ऊन्हातच आपली गाडी पार्क केली होती. बाहेर प्रचंड ऊन असल्याने कारमध्ये कुत्र्याला असह्य होऊ लागलं होतं. यामुळे त्याने आपली सुटका करुन घेण्याचाही प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला आणि आपला जीव गमवावा लागला. हे कुटुंब मूळचं हरियाणाचं आहे.
मृत कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये कुत्रा गाडीत मृतावस्थेत पडल्याचं दिसत आहे. व्हिडीओ बनवणारी व्यक्ती यावेळी लोकांना ताजमहाल पाहायला येताना आपल्या पाळीव प्राण्यांना सोबत आणू नका असं आवाहन करत आहे.
वेस्टर्न गेट पार्किंग येथे ही कार पार्क करण्यात आली होती. गाईडने कुटुंबाला आपल्या कुत्र्याला कारमध्ये सोडू नका असा सल्ला दिला होता अशी माहिती वेस्टर्न गेटवरील अटेंडंटने दिली आहे. त्याने सांगितलं की, 'गाईडने कुटुंबाला आपल्या पाळीव कुत्र्याला कारमध्ये बंद करुन सोडू नका असं सांगितलं होतं. जवळच्या दुकानात काही पैसे देऊन त्याला ठेवू शकतो असा सल्ला त्याने दिला होता. पण तरीही त्याच्या मालकांनी त्याला कारमध्येच सोडून जाण्याचं ठरवलं'.
कुत्र्याला गुदमरु नये यासाठी त्यांनी काच हलकीशी खाली घेतली होती. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. कारण जेव्हा कुटुंब परत आलं तेव्हा कुत्र्याचा तडफडून मृत्यू झाला होता.
सहाय्यक पोलीस आयुक्त अर्चना सिंग यांनी 'द प्रिंट'ला दिलेल्या माहितीनुसार, पाळीव कुत्र्याचा मालक अजय कुमार हा हिसारचा निवासी आहे. तो आपले वडील ऋषी पाल आणि इतर कुटुंबीयांसह ताजमहाल पाहण्यासाठी आला होता. कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतर पार्किंग मॅनेजर गज्जू प्रधान यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांचं पथक यानंतर घटनास्थळी दाखल झालं होतं. त्यांनी पाहणी केली असता कुत्र्याच्या गळ्याभोवती चेन होती. गाडीत गरम झाल्याने असह्य होऊ लागल्यानंतर कुत्र्याने सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केल्याचं प्राथमिकदर्शनी दिसत आहे. यादरम्यान ही चेन कारच्या हँडब्रेकमध्ये अडकली. त्यानंतरही तो सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करत असल्याने गळ्याभोवती असणारी चेन आवळली गेली. ज्यामुळे गुदमरुन त्याचा मृत्यू झाला.
अर्चना सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार ताब्यात घेण्यात आली असून, कुत्र्याच्या मालकांविरुद्ध क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 (1) (i) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कुत्र्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे.