चेन्नईत 38 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने कामाच्या अतिताणामुळे राहत्या घऱात आत्महत्या केली आहे. कामाच्या अतिताणामुळे येणाऱ्या तणावाला कंटाळून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने स्वत:ला विजेचा शॉक देऊन आत्महत्या केली. त्याच्या पत्नीने त्याला वायरमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत पाहिलं. पुण्यातील सीए तरुणीने कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिकेयन हा मूळचा तामिळनाडूमधील थेनी जिल्ह्यातील होता. चेन्नईत तो आपली पत्नी आणि 10 आणि 8 वर्षाच्या दोन मुलासंह राहत  होता. गेल्या 15 वर्षांपासून तो एका सॉफ्टवेअर कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कार्तिकेयनने यापूर्वी कामाच्या दबावामुळे अस्वस्थ असल्याची तक्रार केली होती आणि दोन महिन्यांपासून नैराश्यावर उपचार घेत होता, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 


घटना घडली तेव्हा कार्तिकेयन घरात एकटाच होता. त्याची पत्नी के जयरानी सोमवारी चेन्नईपासून 300 किमी अंतरावरील थिरुनाल्लूर मंदिरासाठी रवाना झाली होती. तिने मुलांना माहेरी सोडलं आणि गुरुवारी रात्री परत आली. दरवाजा ठोठावला असता आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. यानंतर तिने आपल्याकडे असणार्या अतिरिक्त चावीच्या आधारे घराच प्रवेश केला. यावेळी पती कार्तिकेयन जमिनीवर पडलेला असून, त्याच्या शरीराभोवती जिवंत वायर गुंडाळलेली असल्याचं तिला आढळलं. 


पोसिांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे. देशात सध्या पुण्यातील Ernst & Young कंपनीतील सीए तरुणी अॅना सॅबेस्टियनने कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या केल्याने वाद पेटला आहे. केंद्रानेही याची दखल घेतली असून, अहवाल मागवला आहे. त्यातच आता या आत्महत्येने या चर्चेला जोर दिला आहे. 


अॅना सॅबेस्टियन मार्च महिन्यात कंपनीत रुजू झाली होती. 20 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. तिची आई अनिता यांनी कंपनीला जाहीर पत्र लिहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कामाच्या अतिताणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. तसंच त्यांनी दावा केला की कंपनीतील कोणीही तिच्या मुलीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते. "तिच्या अंत्यसंस्कारानंतर, मी तिच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला, परंतु मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. मूल्ये आणि मानवी हक्कांची भाषा करणारी कंपनी त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यातील एका कर्मचाऱ्याच्या अंतिम क्षणी गैरहजर कसे राहू शकतात?", असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे. 


दरम्यान हा मुद्दा समोर येताच केंद्राने अॅनाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या परिस्थितीची चौकशी सुरू केली. गुरुवारी, कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, असुरक्षित आणि शोषणकारक कामाच्या वातावरणाच्या आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे.