एकतर्फी प्रेमातून ट्रेनसमोर ढकलून 20 वर्षीय तरुणीला केलं ठार, बातमी ऐकताच वडिलांनी संपवलं जीवन; कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
आरोपी सतीशविरोधात सीसीटीव्ही आणि 70 साक्षीदारांना पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आलं.
चेन्नईमध्ये 20 वर्षीय कॉलेज तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपी तरुणाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने 2022 मध्ये धावत्या ट्रेनमधून तरुणीला खाली ढकलून तिची हत्या केली होती. 25 वर्षीय डी सतीश या आरोपीला तमिळनाडू महिला छळ प्रतिबंध कायद्यांतर्गत तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.
आरोपीला 35 हजारांचा रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून पीडितेच्या लहान बहिणींना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चेन्नई येथील महिला न्यायालयाच्या न्यायाधीश जे श्रीदेवी यांनी 27 डिसेंबर रोजी सतीशला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत खून आणि तामिळनाडू छळविरोधी कायद्याच्या कलम 4 अंतर्गत दोषी ठरवल्यानंतर हा निकाल दिला. फाशीची शिक्षा मद्रास उच्च न्यायालयाच्या पुष्टीकरणाच्या अधीन आहे.
एस सत्या नावाची पीडित तरुणी चेन्नईच्या दक्षिणेकडील तांबरम येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सेंट थॉमस माउंट रेल्वे स्थानकावर एका वर्गमित्रासह ट्रेनमध्ये चढण्यासाठी सत्या थांबली होती. त्यावेळी सतीश तिच्याजवळ आला. सत्या आणि सतीश आधी मित्र होते. पण नंतर तो तिचा पाठलाग करु लागला होता. एक महिन्यापूर्वी सत्याचा साखरपुडा झाला होता. तेव्हापासून तो तिला सतत त्रास देत होता. त्यावेळी दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला होता. या वादात त्याने ट्रेन रुळावर येत असतानाच ट्रेनसमोर ढकलून दिलं होतं. या धडकेत तिचा मृत्यू झाला होता.
प्रत्यक्षदर्शींनी या भयानक घटनेची माहिती दिली होती. सीसीटीव्हीत ही सगळी घटना कैद झाली होती. खटल्यादरम्यान सादर केलेल्या पुराव्यांमध्ये सीसीटीव्हीने मोलाची भूमिका निभावली. घटनास्थळावरून पळून गेलेल्या सतीशला काही तासांत अटक करण्यात आली.
दरम्यान सत्याच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. सत्या आणि सतीश दोघेही चेन्नईतील अलंदूर येथील पोलीस क्वार्टरमध्ये राहत होते. सत्याची आई पोलिस कॉन्स्टेबल आहे आणि सतीशचे वडील निवृत्त उपनिरीक्षक आहेत. हे कुटुंब एकेकाळी मित्र होते, पण सतीशच्या विचित्र वागण्यामुळे हे नाते बिघडले.
खटल्यादरम्यान, सतीशच्या विरोधात 70 हून अधिक साक्षीदारांनी साक्ष दिली. “आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि तो मरेपर्यंत त्याला लटकवायचे आहे,” असं न्यायाधीशांनी आदेशात म्हटलं आहे.