कोलकातामधील जाधवपूर युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या एका 18 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हॉस्टेल इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरुन खाली पडून विद्यार्थ्याने आपला जीव गमावला. दरम्यान मृत्यूच्या आधी स्वप्नदीप कुंडू वारंवार आपल्या मित्रांना आणि इतर विद्यार्थ्यांना आपण समलिंगी नाही असं सांगत होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीवरुन खाली पडण्याआधी स्वप्नदीप आपल्या सहाकारी विद्यार्थ्यांनी मा समलिंगी नाही असं सांगत होता. दरम्यान पोलिसांना नग्नावस्थेत त्याचा मृतदेह सापडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगालीतील कला शाखेचा विद्यार्थी असलेला नादिया जिल्ह्यातील हंसखळी येथील स्वप्नदीप कुंडू बुधवारी मध्यरात्री वसतिगृहाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. स्वप्नदीप खाली पडल्यानंतर मोठा आवाज आल्याने विद्यार्थ्यांनी धाव घेतली होती. यावेळी त्यांना स्वप्नदीप रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला असल्याचं दिसलं. त्याला तात्काळ केपीसी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं होतं. पण गुरुवारी पहाटे 4.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. 


इमारतीवरुन खाली पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तपास केला असता पोलिसांना त्याने मृत्यूआधी उच्चारलेल्या शब्दांची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी एका माजी विद्यार्थ्याला अटक केली आहे. आरोपी सौरभ चौधरी याने 2022 मध्ये जाधवपूर विद्यापीठातून गणित विषयात एमएससी पूर्ण केलं होतं. परंतु त्यानंतरही तो विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच राहत होता. 


पोलिसांनी कसून चौकशी केली असता सौरभ चौधरी याने आपण स्वप्नदीपची रॅगिंग केली होती, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशी कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. सौरभ चौधरीने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 


सौरभ चौधरी याच्यावर आता भारतीय दंड संहितेच्या कलम 302/34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.