172 Crores in Vegetable Vendor: एका रात्रीत करोडपती व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका भाजीवाल्याला (Vegetable Vendor) करोडपती होणं चांगलंच महागात पडलं आहे. विजय रस्तोगी (Vijay Rastogi) असं या भाजीवाल्याचं नाव आहे. त्याच्या खात्यात एक, दोन नव्हे तर तब्बल 172 कोटी जमा झाले आहेत. आपल्या खात्यात इतकी मोठी रक्कम झाल्याने भाजीवाल्यालाच धक्का बसला आहे. हे आपलं बँक खातं नसल्याचा त्याचा दावा आहे. तसंच इतकी मोठी रक्कम बँक खात्यात जमा झाल्याने प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) आणि पोलीस (Police) चक्रावले असून तपास सुरु केला आहे. 


नेमकी घटना काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील विजय रस्तोगी या भाजीवाल्याच्या खात्यात 172 कोटी रुपये जमा झाले आहेत. प्राप्तिकर विभागाला एका महिन्यापूर्वी गैरव्यवहारांसंबंधी माहिती मिळाली होती. यामध्ये या व्यवहाराचाही उल्लेख होता. यानंतर प्राप्तिकर विभाग आणि पोलीस विजय रस्तोगीच्या चौकशीसाठी पोहोचले होते. ही माहिती मिळाल्यानंतर विजय रस्तोगी यांनाही धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे हे आपलं बँक खातं नसल्याचा त्यांचा दावा आहे. कोणीतरी आपला पॅन क्रमांक आणि इतर माहिती मिळवत बँक खातं उघडलं असावं असा त्यांचा दावा आहे. दरम्यान, या घटनेनंतर विजय रस्तोगी आणि त्यांचं कुटुंब प्रचंड तणावात आहे. 


ऑनलाइन व्यवहार करत हे पैसे पाठवण्यात आले आहेत. दरम्यान इतकी मोठी रक्कम जमा झाल्यानंतर डिजिटल ट्रान्सफर एजन्सीची चौकशी करत आहे. तसंच विजय रस्तोगी यांनी हे आपलं खातं नसल्याचा केलेल्या दाव्याचीही पडताळणी केली जात आहे. दरम्यान, हा ऑनलाइन व्यवहार असल्याने प्राप्तिकर विभागाने हे प्रकरण सायबर क्राइमकडे सोपवलं आहे. 


पोलीस निरीक्षक गहमर पवन कुमार उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, "विजय रस्तोगी यांच्या खात्यात 172 कोटी जमा झाल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ही घटना समोर येताच स्थानिक प्रसारमाध्यमांनी विजय रस्तोगी यांच्या निवासस्थानी धाव घेतली. रस्तोगी यांनी मात्र आपल्याला या 172 कोटींच्या व्यवहाराची कोणतीच कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. आपलं पॅन कार्ड आणि कागदपत्रं वापरुन कोणीतरी खातं उघडलं असावं असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान डिजिटल ट्रान्सफर असल्याने आम्ही हे प्रकरणी सायबर क्राइकडे सोपवलं आहे". 


दरम्यान या व्यवहाराची तपास यंत्रणांनी गंभीर दखल घेतली आहे. रस्तोगी या व्यवहारात सहभागी आहे का किंवा ते खोटी बतावणी करत आहेत का? यासंबंधी तपास केला जात आहे.