Viral News: सध्या टोमॅटोचे दर वाढले असून सर्वसामान्यांना परवडेनासा झाला आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचं आर्थिक बजेटही कोलमडलं आहे. त्यामुळे ताटातून सध्या टोमॅटो गायब झाला आहे. काही घरांमध्ये टोमॅटो भांडणाचं कारण ठरत असून, काही संसार मोडण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशात अशीच एक घटना समोर आली असून, पत्नी थेट घर सोडून गेली आहे. स्वयंपाकात पतीने टोमॅटो वापरल्याने पत्नीने थेट घर सोडून दिलं. या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजीव बर्मन असं पतीचं नाव आहे. त्याचा डबा पुरवण्याचा व्यवसाय आहे. स्वयंपाक करताना त्याने दोन टोमॅटो वापरले होते. यावरुन पत्नीने त्याच्याशी जोरदार भांडण केलं. संजीव बर्मनच्या सांगण्यानुसार, आपल्याला न विचारता स्वयंपाकात टोमॅटो वापरल्याने पत्नी नाराज होती. 


भांडणानंतर पत्नीने मुलीसह घऱ सोडून जाण्याचा निर्णय घेतला अशी माहिती संजीव बर्मनने दिली आहे. त्याने पत्नी आणि मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण शोध लागत नसल्याने त्याने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. संजीव बर्मनने पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. 


संजीव बर्मन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण स्वयंपाक करताना शाकाहारी डिशमध्ये दोन टोमॅटो वापरले होते. दरम्यान, तीन दिवस आपलं पत्नीशी बोलणं झालं नसून ती कुठे आहे याची आपल्याला काहीच माहिती नाही असं त्याचं म्हणणं आहे. पोलिसांनी संजीव बर्मनला त्याच्या पत्नीशी संपर्क साधून लवकरच घऱी आणू असं आश्वासन दिलं आहे. 


टोमॅटोचा दर किती?


महाराष्ट्रात टोमॅटोचा दर सध्या 140 ls 150 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर दिल्लीसह इतर राज्यांनाही टोमॅटो महाग झाल्याने फटका बसला आहे. देशात सर्वात महाग टोमॅटो दिल्ली एनसीआरमध्ये विकला जात आहे. दिल्लीत टोमॅटोचा दर 150 च्या पुढे आहे. यानंतर लखनऊ, चेन्नई यांचा समावेश आहे. 


कृषी विभागाकडून दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न


राज्यात  टोमॅटोचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने कृषी विभाग दर नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. पुणे कृषी आयुक्तालयाच्या ‌वतीने राज्यातील कृषी अधिकाऱ्यांची यांची बैठक घेण्यात आली. टोमॅटो लागवड, उत्पन्न आणि भाव याबाबत अधिक वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. त्यामुळे भाव नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास मदत होणार असल्याचे पुणे कृषी आयुक्तालयाच्या‌ वतीने सांगण्यात आलं आहे.