Crime News: आपल्याकडे डॉक्टराला देवाचं रुप मानलं जातं. जीवन-मरणाच्या संघर्षात डॉक्टर ही एकमेव आशा असते. आंधळा विश्वास ठेवत आपण हे शरीर त्या डॉक्टराकडे सोपवत असतो. पण डॉक्टरच जेव्हा दानवाचं रुप घेतो तेव्हा बसणारा धक्काही तितकाच असतो. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाजियाबाद (Ghazaibad) येथे नुकतीच अशी घटना घडली आहे. डॉक्टरने आपल्या मित्राच्या साथीने एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. दरम्यान त्याचा साथीदार फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाजियाबादमध्ये डॉक्टरने आपल्या एका सहकाऱ्यासह एका महिला रुग्णावर बलात्कार केला आहे. खोडा परिसरात ही घटना घडली आहे. महिला दिल्लीच्या रोहिणी परिसरात राहणारी असून गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तिला गाजियाबादमधील खोडा येथील डॉक्टरबद्दल माहिती मिळाली असता तिने फोन केला होता. यावेळी तिचं डॉक्टर साकिबशी बोलणं झालं होतं. डॉक्टरने आपण तुझं आजारपण कायमचं दूर करु असं आश्वासन देत विश्वास संपादन केला. महिलेनेही डॉक्टरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. 


पण डॉक्टरच्या मनात काही वेगळंच होतं. 7 जूनला महिला पहिल्यांदा डॉक्टर साकिबच्या रुग्णालयात पोहोचली होती. डॉक्टरने महिलेला काही औषधं दिली. पण त्याच्याने काही फरक पडला नाही तेव्हा डॉक्टरने तिला पुन्हा रुग्णालयात बोलावलं. 19 जूनला महिला पुन्हा एकदा रुग्णालयात आली होती. 


पण तेव्हा डॉक्टरने महिलेला गुंगीचं औषध दिलं. यानंतर आरोप डॉक्टर साकिबने आपल्या सहकाऱ्याला बोलावलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेला जाग आली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. यानंतर डॉक्टरने महिलेला धमकावलं. जर याबद्दल कुठेही वाच्यता केली तर सामूहिक बलात्कार करताना शूट केलेला व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी दिली. 


यानंतर घाबरलेल्या महिलेने कोणालाही या घटनेबद्दल सांगितलं नाही. पण नंतर तिने त्याचा भांडाफोड करण्याचा निर्णय घेतला आणि सगळी हिंमत एकटवली. तिने पोलीस स्टेशन गाठत डॉक्टर आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केला. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरनेच आपण याआधीही अनेक मुलींशी असं कृत्य केल्याची कबुली दिली. 


महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसंच आरोपी डॉक्टर साकिबला अटक केली आहे. दरम्यान त्याचा दुसरा साथीदार डॉक्टर जकी सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.