आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेशिवाय दुसरी जास्त विश्वासार्ह जागा नाही. अनेक लोक आपली आयुष्यभराची कमाई बँकेतील खात्यात ठेवत असता. मग ते मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी साठवलेले पैसे असोत किंवा निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी जमा केलेली रक्कम असो. गरज लागेल तेव्हा ते पैसे हमखासपणे आपल्या हातात येतील याची प्रत्येक बँक ग्राहकाला हमी असते. पण उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे एका महिला ग्राहकाला धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. महिलेने  बँकेतील लॉकर उघडून पाहिलं असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुरादाबमधील बँक ऑफ बडोदा येथील एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले 18 लाख रुपये वाळवीत नष्ट झाले आहेत. लॉकर खोलल्यानंतर हा प्रकार समोर आला. महिलेने लॉकरमधील सोनं आणि रोख रक्कम तपासण्यासाठी ते उघडलं असता वाळवीने सगळी रक्कम नष्ट केल्याचं दिसलं. यानंतर तिने बँकेच्या मॅनेजरकडे धाव घेत याप्रकरणी तक्रार केली. सध्या याचा तपास सुरु आहे.  


अलका पाठक यांनी आपल्या लहान मुलीच्या लग्नासाठी तयार केलेले दागिने आणि 18 लाखांची रोख रक्कम ऑक्टोबर महिन्यात बँक ऑफ बडोदाच्या रामगंगा विहार शाखेतील लॉकरमध्ये ठेवले होते. दरम्यान, बँकेने अलका पाठक यांना कराराचे नूतनीकरण आणि केवायसी करण्यासाठी बोलावलं होतं. 


अलका पाठक यांनी सोमवारी बँकेत पोहोचल्यानंतर लॉकर खोलून पाहिलं. यावेळी जे दिसलं ते पाहून त्यांच्या भुवयाच उंचावल्या. कारण वाळवीने त्यांची सगळी रोख रक्कम नष्ट केली होती. यानंतर त्यांनी बँकेला या प्रकाराची माहिती दिली. लॉकरमध्ये जवळपास 18 लाख रोख रुपये आणि दागिने ठेवण्यात आले होते. 


छोट्या मुलीच्या लग्नासाठी जमा केले होते पैसे


अलका पाठक यांचं म्हणणं आहे की, गतवर्षी त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं. तेव्हा नातेवाईंकांनी पाकिटातून पैशांचा आहेर दिला होता. तसंच एका छोट्या व्यावसायातून आणि शिकवणीतून काही पैसे जमा झाले होते. आपल्या दुसऱ्या मुलीच्या लग्नासाठी ऑक्टोबर 2020 रोजी 18 लाख रुपये आणि काही दागिने एका पिशवीत ठेवत ते लॉकरमध्ये ठेवले होते. 


लॉकरमध्ये पैसे ठेवू शकत नाही याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती. मी स्वत: लॉकरमध्ये दागिने आणि 18 लाख रुपये ठेवले होते. सोमवारी केवायसी करण्यासाठी आल्यानंतर मी लॉकर उघडल्यानंतर मला सगळी माहिती मिळाली असं अलका पाठक यांनी सांगितलं आहे. दरम्यान, बँकेने याप्रकरणी तपास करत रिपोर्ट पाठवला आहे.