नवऱ्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने बेड पुसायला लावल्यानंतर महिला अखेर झाली व्यक्त, म्हणाली `मला जे सहन...`
रोशनीचा नवरा, दीर आणि सासऱ्याची दिवाळीच्या दिवशी जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती.
मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे एका महिलेला पतीच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने बेड पुसायला लावला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रोशनी मारवी असं या महिलेचं नाव असून तिच्यासाठी तो दिवस आता एक वाईट आठवण होता. पण ती आठवण आता अंधुक होऊ लागली होती. पण त्या व्हिडीओमुळे तिला सतत त्या दिवसाच्या आठवणी ताज्या होत आहेत.
रोशनी पाच महिन्यांची गर्भवती आहे. 31 ऑक्टोबरला ती आपला पती शिवराजची वाट पाहत होती. शिवराज ऑटो ड्रायव्हर होता. त्याच्या दोन्ही मुली दिवाळीसाठी आणलेले नवे कपडे घालणार होत्या. रोशनी आणि शिवराज कुटुंबाचा विरोध असतानाही 2016 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. "माझ्या कुटुंबाने सांगितलं त्याच्याकडे पैसा नाही. मी हे महत्त्वाचं नाही असं सांगितलं. मी इतर कोणासोबत राहू शकत नाही," अशी माहिती तिने इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना सांगितलं.
रोशनी आणि शिवराज हे कुटुंबासह मातीच्या घरात राहतात. त्यांच्याकडे फारशी संपत्तीही नाही. रोशनी एका दगडांच्या खाणीत काम करते आणि दोन वेळच्या जेवणाची सोय होईल इतकं कमावते.
गुरुवारी संध्याकाळी शिवराज, त्याचा भाऊ रघुराज आणि त्यांचे वडील धरम सिंग यांची 20 ते 25 जणांच्या जमावाने काठ्या, रॉडने हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या जमावात त्यांचे नातेवाईकही होते. जमिनीच्या वादातून त्यांची हत्या झाली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवराज यांचा भाऊ धरम सिंग (28) यांची प्रकृती गंभीर आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चार जणांना अटक करण्यात आली असून उर्वरितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रोशनी आणि त्यांच्या दोन मुलींनी शिवराजला कोसळताना पाहिला. “आम्ही वादग्रस्त जमिनीवर काही धान्य उगवलं होत त्यांनी कुऱ्हाडाने माझ्या पतीला ठार केलं. आम्ही एकत्र दिवाळी साजरी करणार होतो. त्याने आपल्या मुलींसाठी विकत घेतलेले कपडे अजूनही उघडलेले नाहीत,” असं ती म्हणाली.
रोशनीने सांगितलं की तिने पोलिसांना फोन केला पण कोणीही वेळेवर पोहोचले नाही. काही तासांनंतर, ती गडसराय प्राथमिक आरोग्य केंद्रात होती. “माझ्या दोन मुली वडिलांबद्दल विचारत होत्या, पण त्यांचा चेहरा इतका खराब झाला होता की त्यांना ओळखता आलं नाही. मी त्याच्या मृतदेहाशेजारी रडच बसले. मग, मला माझ्या दीर ज्या बेडवर मृत्यू पावला तो पुसण्यास सांगण्यात आलं. मी तेव्हा फारसा विचार केला नाही. मला फक्त माझ्या सुरक्षिततेची भीती वाटत होती कारण आमच्या कुटुंबातील सर्व पुरुष मरण पावले होते. फक्त महिला उरल्या आहेत,” असं ती म्हणाली.
"मी नंतर तो व्हिडीओ पाहिला आणि काय सहन करावं लागंल यावर विश्वासच बसला नाही. मला आता फार काही आठवत नाही. मी घरी गेल्यानंतर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिला," असं तिने सांगितलं.
या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळताच दिंडोरी प्रशासनाने कारवाई केली आहे. शनिवारी मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (दिंडोरी) यांनी उपस्थित डॉक्टर चंद्रशेखर सिंग यांची बदली करण्याचे आदेश जारी केले आणि राजकुमारी मरकम आणि छोटी बाई ठाकूर या दोन परिचारिकांना निलंबित केले.
सिंग यांनी दावा केला की रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेला कधीही बेड साफ करण्यास सांगितलं नाही. “गुरुवारी जमिनीच्या वादात या पुरुषांवर गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यापैकी दोघांना आमच्या सुविधेत आणण्यात आलं. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने आम्हाला पलंगावरील रक्त कापडाने पुसण्यास सांगितलं जेणेकरून ती रक्तस्त्राव किती प्रमाणात झाला याचा पुरावा म्हणून वापरू शकेल. तिला बेड साफ करण्यास सांगितले नाही. मला महिला किंवा तिच्या कुटुंबाकडून कोणतीही तक्रार आलेली नाही,” असं तो म्हणाला. रोशनीने मात्र हे खोटं बोलत असल्याचा दावा केला आहे.