...अन् छोट्या भावाने वहिनीसोबतच केलं लग्न, नेमकं असं काय झालं?
फेशिअल करण्याच्या बहाण्याने पळून गेलेला नवरदेव 10 दिवसांनी आपल्या प्रेयसीसह घरी परतला. दोघांनीही कोर्टात लग्न केलं होतं. यानंतर कुटुंबाना मात्र त्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. शशांकच्या वडिलांनी मुलाच्या अशा वागण्यामुळे आपल्याला फार लाज वाटत असून, त्याच्याशी आता काही देणंघेणं नसल्याचं म्हटलं आहे.
लग्नाचा (Marriage) मंडप सजला होता. नवरीमुलगीही (Bride) आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणासाठी नटून तयार झाली होती. मंडपात पाहुण्यांनी गर्दी केली होती. काही वेळातच लग्न लागणार होतं. पण भलतंच काहीतरी झालं आणि नवरदेवाच्या लहान भावानेच आपल्या होणाऱ्या वहिनीसह लग्न केलं. कुटुंबीयांनीही या लग्नाला संमती दर्शवली अन् अखेर ठरल्यानुसार हा विवाह पार पडला. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) ही घटना घडली आहे.
नेमकं झालं तरी काय?
लग्न लागणार होतं तितक्यात नवरदेव जागेवर नसल्याचं लक्षात आलं. फेशिअल करण्याच्या बहाण्याने नवरदेव पळून गेला असल्याचं समजताच मंडपात एकच गोंधळ उडाला. अखेर 10 दिवसांनी तो आपल्या प्रेयसीसह कोर्टात लग्न करुन घरी परतला. यानंतर कुटुंबाचा मात्र संताप झाला. त्यांनी त्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. शशांकच्या वडिलांनी मुलाच्या अशा वागण्यामुळे आपल्याला फार लाज वाटत असून, त्याच्याशी आता काही देणंघेणं नसल्याचं म्हटलं आहे. जर आपला लहान मुलगा लग्नासाठी तयार झाला नसता तर परिस्थिती आज फार गंभीर असती असं ते म्हणाले आहेत.
मोहम्मदपूर गावात राहणारे मावत तिवारी यांचा मोठा मुलगा शशांकचं बरेलीमध्ये लग्न ठरलं होतं. 1 जानेवारीला वरात येणार होती. पण वरात जाण्याच्या काही तास आधी नवरदेव फेशिअल आणि केस काळे करण्याच्या बहाण्याने घऱातून पळून गेला होता. बराच वेळ होऊनही शशांक परतला नाही, तेव्हा नातेवाईकांना चिंता सतावू लागली होती. बराच वेळ शोध घेऊनही शशांकचा काही शोध लागत नव्हता.
यानंतर शशांकच्या कुटुंबाने नवरीमुलीच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि छोटा भाऊ विषर्भला नवरदेव बनवून पोहोचले. विषर्भने आपल्या होणाऱ्या वहिनीसहच सप्तपदी घेतली आणि विवाहबंधनात अडकला. यादरम्यान दुसरीकडे पोलीस शशांकचा शोध घेत होते. शशांकचा शोध घेण्यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात आली.
पोलीस अधिकारी अचल कुमार यांनी सांगितलं की, बेपत्ता झालेल्या नवरदेवाच्या सीडीआरवरुन एका तरुणीचा नंबर मिळाला. यानंतर तिला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी कऱण्यात आली. सुरुवातीला तिने काहीच सांगितलं नाही. पण जेव्हा कठोरपणे चौकशी करण्यात आली तेव्हा मात्र तिने आपण शशांकसह कोर्ट मॅरेज केल्याचं कबूल केलं. तरुणीने पोलिसांना कोर्टातील कागदपत्रंही दाखवली.
यानंतर शशांकच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आलं. शशांकच्या वडिलांनी आपण मुलासह सर्व नाती तोडली असल्याचं म्हटलं. दोघे सज्ञान असून जे हवं ते करु शकतात असं सांगत त्यांनी त्यांना घऱात घेण्यास नकार दिला.