Aadhaar Card चार पद्धतीचं असतं माहिती आहे का? जाणून घ्या स्पेशल फीचर्स
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड एक महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. सरकारी आणि खासगी ठिकाणी कामासाठी आधार कार्डची आवश्यकता असते.
Aadhaar Card: भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड एक महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. सरकारी आणि खासगी ठिकाणी कामासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. मुलांचे प्रवेश, बँक खाते उघडणे, प्रवास करताना, हॉटेल बुक करणे, मालमत्ता खरेदी करणे, बाजारात गुंतवणूक करणे यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. आधार कार्डवर नाव, फोटो, जन्मतारीख, पत्ता आदींची नोंद केली जाते. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) 12 अंकी ओळख क्रमांक प्रदान करते. या दस्तऐवजाचे महत्त्व लक्षात घेऊन UIDAI ने आधारचे अनेक प्रकार जारी केले आहेत. चला तर जाणून घेऊयात हे चार प्रकार कोणते आहेत?
आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC Card): UIDAI द्वारे जारी केलेल्या आधार PVC कार्डची नवीन आवृत्ती आहे. टिकाऊ असण्याव्यतिरिक्त, PVC-आधारित आधार कार्डमध्ये डिजिटल QR कोड, फोटो आणि लोकसंख्याशास्त्रीय माहितीसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही आधार क्रमांक, व्हर्च्युअल आयडी किंवा नावनोंदणी आयडीद्वारे uidai.gov.in किंवा Resident.uidai.gov.in वर भेट देऊन डाउनलोड करू शकता, यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल.
ई-आधार (eAadhaar): ही आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती आहे. तसेच पासवर्ड संरक्षित आहे. यात ऑफलाइन पडताळणीसाठी सुरक्षित QR कोड देखील आहे. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाद्वारे UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ई-आधार तयार केले जाऊ शकते. डाउनलोड करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
आधार लेटर (Aadhaar Letter): आधारकार्ड कागदावर आधारित लॅमिनेटेड लेटर आहे. लेटरवर कार्ड जारी करण्याची तारीख आणि प्रिंट तारखेसह सुरक्षित QR कोड असतो. जर तुम्हाला नवीन आधार बनवायचा असेल किंवा त्यात बायोमेट्रिक अपडेट करायचे असेल तर हे आधार लेटर मोफत आहे. मूळ प्रत हरवल्यास किंवा खराब झाल्यास, आधार लेटर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन बदलता येईल. यासाठी 50 रुपये आकारले जातात.
एम आधार (mAadhaar): UIDAI ने विकसित केलेले अधिकृत मोबाईल ऍप्लिकेशन (mAadhaar Mobile App) आहे. आधार धारकांना CIDR कडे नोंदणीकृत त्यांचे आधार रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक इंटरफेस प्रदान करते. mAadhaar प्रोफाइलला विमानतळ आणि रेल्वेने वैध आयडी पुरावा म्हणून मान्यता दिली आहे.