आता मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक
नवी दिल्ली – आधी सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक होतं. त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यास सांगण्यात आलं. मात्र, आता मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारने एक परिपत्रक काढलं असून त्यात मृत्यूच्या दाखल्यासाठी सुधारित नियमावली दिली आहे. यानुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांकही मृत्यूचा दाखला काढताना द्यावा लागणार आहे.
विविध सरकारी सेवांसाठी सरकारने आधार बंधनकारक केलेलं असून आता मृत्यूच्या दाखल्यासाठीही आधार कार्ड गरजेचं करण्यात आलं आहे. १ ऑक्टोबर २०१७ पासून हा निर्णय लागू होणार आहे. सरकारने काढलेल्या या नव्या नियमामुळे आधार कार्ड काढणं हे सर्वांनाच बंधनकारक झालं आहे.
मयत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही आणि मृतकांची माहितीही उपलब्ध असावी यासाठी हा नियम लागू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
यामुळे आता मृत्यूच्या दाखल्यासाठी अर्ज करणा-या व्यक्तीला मृत व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक किंवा ‘आधार’साठी केलेल्या अर्जाचा क्रमांक द्यावा लागणार आहे. मृत्यू प्रमाणपत्र आधारने लिंक केलेलं असल्यास ओळख पटवण्याची अडचण होणार नाही असेही म्हटले जात आहे.