नवी दिल्ली : खासगी संस्थांना आधार कार्डची सक्ती करता येणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला असला तरी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मात्र आधार क्रमांकाची आवश्यकता भासते. अशावेळी तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. अनेकदा तुमच्याकडे आधार कार्ड आहे परंतु, त्यावरील माहिती मात्र चुकीची असेल तर अशावेळीही आधार कार्ड तुम्ही तुमची ओळख म्हणून वापरू शकत नाही. अशावेळी 'आधार'मध्ये दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नसतो. परंतु, यापुढे आधारच्या माहितीत दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अधिक शुल्क मोजावं लागणार आहे. 'यूआयडीएआय'नं ही दरवाढ केली आहे. सरकारने दिलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव दराची अंमलबजावणी १ जानेवारीपासून करण्यात आली आहे. 
 


असं असेल वाढीव शुल्क


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- अंगठ्याच्या ठशांमध्ये बदल करायचे (बायोमॅट्रीक) असेल तर आता १०० रुपये मोजावे लागणार आहेत. ज्या मुलांचे आधार कार्ड वयाच्या १५ वर्षांआधी बनवले आहे, त्यांची बायोमॅट्रीक माहिती १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बदलावी लागते. 


- आधार नोंदणीच्या वेळी दिलेला मोबाईल क्रमांक उपलब्ध नसेल तर तुम्हाला आधारवरील मोबाईल नंबर अपडेट करावा लागतो. यासाठी तुम्हाला ५० रुपये मोजावे लागतील.


- एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केल्यानंतर आधार कार्डावर पत्त्यात बदल करण्यासाठी सुधारीत दरांनुसार ५० रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी यासाठी ३० रुपये शुल्क आकारलं जायचं.


- केवायसी (Know Your Customer) अपडेट करण्यासाठी ३० रुपये मोजावे लागणार आहेत.


- तसेच आधार कार्डच्या कलर प्रिंटसाठी ३० रुपये द्यावे लागणार आहे.


नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आधार काढण्याची सोय बँकांमध्ये तसेच पोस्टात करण्यात आली आहे. ग्रामीण भागात आधार संदर्भातील कामांसाठी सार्वजनिक सेवा केंद्र (CSC) स्थापन करण्यात आली होती. परंतु, यूआयडीएआयने त्यावर बंदी आणली. नागरिकांच्या सोईसाठी ही केंद्र पुन्हा सुरू केली जावीत, अशी मागणी केली जातेय.