नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारने अनेक सरकारी योजना आणि महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. मात्र सरकार एवढ्यावरच थांबलेले नाही. यापुढे जात सरकारने पशूंसाठी देखील आधार कार्डची सक्तीचे करण्याची योजना केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कदाचित तुम्हाला हे थोडेसे विचित्र वाटेल. पण आता गायीचे नाव, पत्ता, फोटो, त्यांची दूध देण्याची क्षमता आणि स्वास्थ्य संबंधित माहिती आधार कार्डच्या मार्फत ठेवली जाणार आहे. मध्य प्रदेशात गायींचे आधार कार्ड बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गायींची ओळख पटवण्यासाठी १२ अंकांचा डिजिटल आधार कार्ड देशात कुठूनही तुम्ही एका क्लिकवर पाहू शकाल. 


एक स्मार्ट चिप मध्य प्रदेशातील सगळ्या ९० लाख दूध देणाऱ्या प्राण्यांच्या कानात लावली जाईल. केंद्र सरकार ही योजना देशातील इतर राज्यातही सुरू करण्याच्या विचारात आहे. सध्या ही योजना मध्य प्रदेशातील शाजापूर, धार, आगर मालवा आणि खरगोन मधील उमरे एक हजार गाई गुरांवर लागू करण्यात आली आहे. याच्या यशानंतर लवकरच सरकार ५१ जिल्ह्यातील सर्व गाई-गुरांसाठी आधार कार्ड बनवण्याच्या तयारीत आहे. 


या योजनेसाठी एका विशेष सॉफ्टवेअरची तयारी करण्यात आली आहे.  पशुपालन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गायींचे ओळखपत्र बनवण्यासाठी टॅबलेटस देण्यात येतील. यात ते पशूंची माहिती सेव्ह करू शकतात. टॅबलेट खरेदी करण्यासाठी सरकारने टेंडर भरण्यास सुरुवात केली आहे. पशूंच्या कानात लावण्यात येणाऱ्या चिप्स नोव्हेंबरच्या अखेरीस पर्यंत येण्याची संभावना आहे. 


सरकारची ही पशु संजीवनी योजना देशभरात राबवण्यात येणार आहे. या पूर्ण अभियानासाठी १५ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. १५ कोटीमधील ४०% म्हणजेच ६ कोटी रुपये राज्य सरकारकडून देण्यात येतील. नोव्हेंबर अखेरीस पर्यंत सर्व जिल्ह्यात आधार कार्ड बनवण्याचे काम सुरू केले जाईल. मार्च २०१८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.