नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन कमबॅंक करण्याची शक्यता आहे. पण, राजन यांचा कमबॅंक हा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून नव्हे तर, राज्यसभा सदस्य म्हणून होण्याची शक्यता आहे. पण, हे सर्व तेव्हाच घडणार आहे, जेव्हा दिल्लिचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खेळीला रघुराम राजन 'आप'लेसे करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजनच का?


पुढच्या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून अर्थातच जानेवारीपासून राज्यसभेच्या जागा रिक्त होण्यास सुरूवात होईल. राजधानी दिल्लीकडे असलेल्या कोट्यातूनही तीन जागा रिक्त होत आहेत. या तीन जागांपैकी एक म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात उमेदवार म्हणून रघुराम राजन यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. भाजप सरकार सत्तेत आले तेव्हा अल्पावधीत राजन यांच्या गव्हर्नर पदाचा कार्यकाळ संपला. मुळात त्यांना मुदतवाढ मिळाल्यास गव्हर्नर म्हणून काम करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांना मोदी सरकारने मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अध्यापन क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले, अशी चर्चा आहे. त्यात मोदी सरकारला अडचणीत आणायचे तर, राज्यसभेत तगडा उमेदवार असायला हवा याची केजरीवाल यांना पक्की जाणीव आहे. त्यामुळेच आपमध्ये राजन यांच्या नावाची चर्चा असल्याचे समजते.


दरम्यान, काही वृत्तवाहीन्यांनी वृत्त दिले आहे की, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आम आदमी पक्षाने रघुराम राजन यांना अधिकृत मेलही पाठवला आहे. मात्र, राजन यांच्याकडून या मेलबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आली नाही. मात्र, या कथीत मेलला 'आप'लेसे करत राजन यांनी सकारात्मक उत्तर दिल्यास, राजन राज्यसभेवर जाऊ शकतील.


'आप'ची व्यापक गणिते


दरम्यान, सूत्रांकडील माहितीनुसार 'आप'मधील एक गट राजन यांना पक्षाकडून राज्यसभेवर पाटविण्यासाठी आग्रही आहे. यापाठीमागे पक्षाचा व्यापक विस्तार हा हेतू आहे. 'आप'च्या माध्यमातून राजन राज्यसभेवर गेल्यास त्याचा फायदा दिल्लीबाहेरही होणार आहे. कारण, एक स्वच्छ व्यक्तिमत्व म्हणून राजन यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे आम आदमी पक्षाची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी त्याचा फायदाच होईल असा या गटाचा व्होरा आहे. असे घडल्यास २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही आपला चांगला फायदा होईल, असे या गटाचे म्हणने आहे.


'आप'समध्ये स्पर्धा


दरम्यान, आम आदमी पक्षातील कुमार विश्वास, संजय सिंह, आशुतोष आणि दिलीप पांडेय यांच्यासारखे अनेक नेतेही राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सूक असल्याचे समजते. त्यामुळे राज्यसभेसाठी केजरीवाल आणि त्यांची टीम कोणाला 'आप'लेसे करते यावर बरेच काही आवलंबून असणार आहे. महत्त्वाचे असे की, संख्याबळाच्या आधारे आम आदमी पक्ष तीन सदस्या राज्यसभेवर पाठवू शकतो.