नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता आमिर खान, नसीरुद्दीन शहा आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे गद्दार असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केली. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमिर खान, नसीरुद्दीन शहा आणि नवज्योतसिंग सिद्धू यांना गद्दार म्हणून संबोधले. इंद्रेश कुमार यांनी त्यांची तुलना राजपूत राजा जयचंद आणि बंगालचा नवाब मीर जाफर यांच्याशी केली. तसेच भारताला अजमल कसाबसारख्या तरुणांची नव्हे तर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
नसीरुद्दीन शहा आणि आमिर खान हे चांगले अभिनेते असतील. मात्र, ते गद्दार असल्यामुळे त्यांना तेवढाही सन्मान देता येणार नाही. देशातील जो कोणी अजमल कसाबच्या मार्गावरून चालेल त्याला गद्दारच ठरवले जाईल, अशा इशारा इंद्रेश कुमार यांनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामजन्मभूमी हे अटळ सत्य, ठिकाण बदलणे अशक्य- इंद्रेश कुमार


यावेळी इंद्रेश कुमार यांनी अयोध्येतील राम मंदिरासंदर्भातही भाष्य केले. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या विरोधामुळे अयोध्या खटल्याचा निकाल लांबवणीवर पडला आहे. यासाठी काही न्यायाधीशही जबाबदार आहेत. मी देशातील साधू-संतांना आव्हान करू इच्छितो की, त्यांनी या नेत्यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन सुरु करावे, असेही इंद्रेश कुमार यांनी सांगितले.