दिल्लीत मोदी सरकारविरोधात `आप`ची सभा, विरोधक येणार एकत्र
विरोधक पुन्हा एकत्र येणार?
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या विरोधात उद्या दिल्लीत आम आदमी पक्षानं आयोजित केलेल्या जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीत येत आहे. ममता बॅनर्जी गुरुवारपर्यंत दिल्लीत मुक्कामी असतील. दौऱ्यात त्यांचा विरोधीपक्षांच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत. उद्या म्हणजे १३ फेब्रुवारीला दिल्लीतील जंतरमंतरवर आम आदमी पक्षानं, हुकूमशाही हटवा, देश वाचवाचा नारा देऊन जाहीर सभा आयोजित केली आहे. या जाहीर सभेत ममता बॅनर्जींसह विरोधीपक्षाचे सगळे बडे नेते सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान आम आदमी पक्षाच्या या जाहीर सभेत काँग्रेस सहभागी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ममता बॅनर्जी यांनी धरणं आंदोलन केल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत उपोषणाचं अस्त्र उगारलं. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी त्यांनी उपोषण केलं. त्यानंतर आता आम आदमी पक्ष मोदींविरोधात जाहीर सभा घेत आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषणात नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे माजिद मेनन यांनी चंद्राबाबू नायडूंना यांनापाठिंबा दिला. तर राहुल गांधी यांनीही नायडूंची भेट घेऊन पाठिंबा दिला.
भाजपला रोखण्यासाठ सर्वच प्रादेशिक राज्यांतील नेते सक्रिय झाले आहेत. केवळ मोदींना विरोध नव्हे तर राज्य वाचविणे हे आव्हान देखील प्रादेशिक नेत्यांसमोर आहे. म्हणूनच ममता यांच्या नंतर चंद्राबाबू आणि आता आपची जाहीर सभा होत आहे. हे शस्त्र किती परिणामकारकपणे काम करतं हे आगामी काळातच कळेल.