लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला `आप`चा धक्का
महाआघाडीच्या प्रयत्नाना अजूनही यश नाही
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरुद्ध इतर पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याचा राहुल गांधी यांच्या प्रयत्नाना आणखी एक धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाने महाआघाडीसोबत निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी म्हटलं की, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि गोवा येथे आप स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. निवडणूक जशी-जशी जवळ येते आहे तसं राजकीय हालचालींना वेग येत आहे. केंद्रातील मोदी सरकारला हरवण्यासाठी विरोधी पक्ष महाआघाडी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मोठ्या पक्षांच्या राजकीय स्वार्थामुळे महाआघाडीचा मार्ग सोप नसणार आहे.
याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील महाआघाडीपासून लांब राहण्याचे संकेत दिले आहेत. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील काँग्रेसवर टीका करत आहेत. उत्तर प्रदेशात सपा-बसपाने काँग्रेसला सोडून एकत्र निवडणूक लढवण्याचा विचार सुरु केला आहे. ३ राज्यांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर ही महाआघाडीला इतर राजकीय पक्ष तयार होत नाही आहेत. त्यात आता आपने देखील महाआघाडीला नकार दिल्याने काँग्रेसला हा एक प्रकारचा झटकाच मानला जात आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादीने देखील राहुल गांधी हे महाआघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील की नाही याबाबत थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं की, निकाल लागल्यानंतर हा निर्णय होईल. त्यामुळे रहा राहुल गांधी यांच्यासाठी एक धक्काच मानला जात आहे.