मुंबई : देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बँकिंग फसवणुकीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एबीजी शिपयार्डविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुमारे 22 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.  (CBI Registered case against abg shipyard in bank fraud of rs 22482 crore)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

28 बँकांची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एबीजी शिपयार्ड आणि त्याच्या संचालकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. कंपनी जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. त्याचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे आहेत.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


ABG शिपयार्ड आणि त्यांच्या संचालकांवर 28 बँकांची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एबीजी शिपयार्ड आणि त्यांचे संचालक ऋषी अग्रवाल, संथानम मुथुस्वामी आणि अश्विनी अग्रवाल यांनी 22,000 कोटी रुपयांहून अधिक बँकांची फसवणूक केल्याचे केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे म्हणणे आहे.


हजारो कोटींची फसवणूक


एसबीआयच्या तक्रारीनुसार, कंपनीने त्यांच्याकडून 2925 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ICICI कडून 7089 कोटी, IDBI कडून 3634 कोटी, बँक ऑफ बडोदा (BOB) कडून 1614 कोटी, PNB कडून 1244 कोटी आणि IOB कडून 1228 कोटी रुपयांची थकबाकी आहे.


नीरव मोदीपेक्षाही मोठी फसवणूक


याप्रकरणी आता सीबीआयने पुढील तपास सुरू केला आहे. सर्व संबंधित कागदपत्रांची छाननी केली जात आहे. यापूर्वी हिरे व्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेसोबत (PNB Bank Fraud) 14 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण खूप चर्चेत आले होते. नीरव मोदीच्या देश-विदेशातील अनेक मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचे लंडनमधून भारतात प्रत्यार्पण करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.


विजय मल्ल्यावरील सुमारे 9 हजार कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचे प्रकरणही चर्चेत आहे. त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याची कसरत अंतिम टप्प्यात आहे. आता या प्रकरणात त्या पेक्षाही मोठी फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे.