नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्त्वामुळेच तिहेरी तलाकची प्रथा रद्द झाली. त्यामुळे भविष्यात नरेंद्र मोदी यांना थोर समाजसुधारकांच्या पंक्तीत स्थान मिळेल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. ते रविवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशनल क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी अमित शहा यांनी म्हटले की, तिहेरी तलाकची प्रथा रद्द झाल्याने मुस्लिम महिलांना प्रतिष्ठा आणि सन्मानाने जीवन जगता येईल. मात्र, या सगळ्यावर विरोधकांनी घेतलेली भूमिका हा लांगूलचालनाचा प्रकार आहे. साधारणपणे एखाद्या वाईट सामाजिक प्रथेचे उच्चाटन झाल्यास समाजाकडून त्याचे स्वागत होते. मात्र, केवळ लांगूलचालनासाठी विरोधकांनी टोकाची भूमिका घेतली. यावेळी शहा यांनी तिहेरी तलाकच्या प्रथेला मुठमाती देणाऱ्या देशांचेही उदाहरण दिले. अनेक इस्लामी देशांनी दशकभरापूर्वीच हे पाऊल उचलले होते. तेव्हाच सिद्ध झाले होते की, तिहेरी तलाक हा इस्लामी प्रथेचा भाग नाही, याकडे अमित शहा यांनी लक्ष वेधले.


याच लांगूलचालनामुळे सामाजिक एकात्मता आणि विकास बाधित होतो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत, काटेकोर नियोजन, निष्ठा, समर्पण आणि सहानुभूतीची गरज असते, असेही शहा यांनी म्हटले. 


पाच वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने २५ ऐतिहासिक निर्णय घेऊन देशाची दिशा बदलण्याचे काम केले. ५० टक्के मुस्लिम महिलांना या प्रथेचा त्रास सहन करावा लागत हाेता. आम्ही जर हे विधेयक संसदेत मांडलं नसतं तर हा भारतावरील सर्वात मोठा कलंक ठरला असता. मात्र, मोदींच्या कणखर नेतृत्त्वामुळेच ही कणखर प्रथा रद्द झाली, असे शहा यांनी सांगितले.