दिल्ली विद्यापीठावर अभाविपचा झेंडा; NSUI च्या पदरात केवळ एकच जागा
मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यामध्ये आतापर्यंत अभाविपने बाजी मारल्याचे चित्र आहे. तर काँग्रेसप्रणित एनएसयुला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आणि संयुक्त सचिव पदावर अभाविपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत एनएसयुचा उमेदवारी विजयी झाला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
मतदान यंत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी काही वेळासाठी मतमोजणी रोखून धरली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल समोर आले.
या निवडणुकीसाठी दिल्लीतील ५२ केंद्रांवर मतदान झाले होते. प्रचारादरम्यान अभाविप आणि एनएसयुकडून विद्यार्थ्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. अभाविपने संघटनेच्या एकूण निधीपैकी ५० टक्के रक्कम महिला व सामाजिक न्यायासंदर्भातील उपक्रमांवर खर्च करण्याचे आश्वासन दिले होते. तर एनएसयुने संस्थेला 'इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स'चा दर्जा मिळवून देण्याचे आणि विद्यार्थ्यांसाठी दहा रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध करुन देऊ, असे सांगितले होते.