जयपूर: काळ कधी कुठे कसा गाठेल याचं नेम नाही तो सांगून येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काळानं गाठलं आणि घात झाला. ट्रक आणि व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. व्हॅनमधून परीक्षेसाठी विद्यार्थी निघाले होते. या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 5 लोक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हॅनमधून विद्यार्थी REET परीक्षा देण्यासाठी जात होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. ही धक्कादायक घटना राजस्थान इथल्या जयपूर शहरातील चाकसू परिसरात शनिवार सकाळी NH-12 इथे घडली आहे. मृत व्यक्तींमध्ये गौरधनपुरा नयापुरा इथले राहणारे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 


या भीषण अपघातात व्हॅन चालकाचाही जागीच मृत्यू झाला आहे. व्हॅनमध्ये 11 लोक होते. काही विद्यार्थी देखील होते जे रीट परीक्षा देण्यासाठी जात होते. एका विद्यार्थ्याची प्रकृती अति गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यावर  चाकसू हॉस्पिटल  तर उर्वरित 2 जखमींवर महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 


मृतांच्या अॅडमिट कार्डवरून त्यांची ओळख पटली आहे.त्यावर त्यांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख तर जखमींना 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर अशोक गेहलोत यांनी प्रवास करताना सर्व विद्यार्थ्यांनी सावध राहायला हवं असं आवाहन देखील केलं आहे.