नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणात पोलिसांनी 'जेएनयू'चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याखाली (UAPA) गुन्हा दाखल केला आहे. रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पेशल सेलने यापूर्वीही उमर खालिदची चौकशी केली होती. चौकशी दरम्यान स्पेशल सेलने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला दंगलीबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यापूर्वी केलेल्या भाषणाबद्दलही उमर खालिद याची चौकशी गेली होती.

दरम्यान, उमर खालिदच्या अटकेनंतर 'युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप'ने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, ११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील सूत्रधार म्हणून अटक केली आहे. दिल्ली पोलिस हिंसाचाराच्या तपासाच्या नावाखाली हिंसक आंदोलनांना चालना देत आहेत. 



काहीही केलं तरी सीएए आणि एनआरसीविरूद्ध लढा सुरूच राहणार आहे. त्याला जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करणे हे आमचे प्राधान्य आहे आणि दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुरक्षेची पूरेपूर काळजी घ्यावी, असे युनायटेड अगेन्स्ट हेटने म्हटले आहे.

यापूर्वी पोलिसांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव, अर्थतज्ज्ञ जयती घोष, लघुपट निर्माते राहुल रॉय आणि दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अपुर्वानंद यांच्यावरही दिल्ली हिंसाचारप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. 

या सर्व नेत्यांनी CAA विरोधकांनी कोणत्याही थराला जा, असे सांगितले. तसेच CAA आणि NRC हे मुस्लिमविरोधी असल्याचे सांगून लोकांमध्ये असंतोष निर्माण केला. तसेच भारत सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी आंदोलन केले, असे दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे. दिल्लीच्या उत्तर पूर्व जिल्ह्यात २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या रोजी झालेल्या दंगलीत ५३ लोकांचा मृत्यू झाला होता तसेच ५८१ लोक जखमी झाले होते. ज्यांपैकी ९७ गोळी लागून जखमी झाले होते.