Shekhar Suman Joins BJP: लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक वाढली आहे. यामागील कारण म्हणजे लोकप्रिय टीव्ही अभिनेता शेखर सुमने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.


विनोद तावडेंच्या उपस्थितीत प्रवेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित शेखर सुमने भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळेस भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, राष्ट्रीय प्रसारमाध्यम विभाग प्रमुख अनिल बालुनी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्ली येथील भाजपाच्या मुख्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. शेखर सुमनने यावेळेस आपल्या भावना व्यक्त करताना कालपर्यंत आपल्याला आपण असं काही पाऊल उचलू याची कल्पना नव्हती असं म्हटलं आहे. आपल्याला देवाने हा निर्णय घेण्याचा आदेश दिला याबद्दल आपण परमेश्वराचे आभारी आहोत, असं शेखर सुमन म्हणाला.


मलाच कालपर्यंत ठाऊक नव्हतं की...


"मलाच कालपर्यंत ठाऊक नव्हतं की मी इथे असा तुमच्याशी संवाद साधायला बसलेलो असेल. आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी घडतात. कधीतरी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे कळत नाही. वरुन तुम्हाला कोणीतरी दिशा दाखवतं आणि तुम्ही त्या दिशेनुसार चालत राहता. मी इथे सकारात्मक दृष्टीकोन घेऊन आलो आहे. मी परमेश्वराचे आभार मानू इच्छितो की देवाने मला इथपर्यंत आणलं," असं शेखर सुमनने म्हटलं.


मी जोपर्यंत काही करुन दाखवत नाही तोपर्यंत..


"प्रभू रामचंद्रांनी जे शिकवलं आहे त्याचं आपण पालन केलं पाहिजे. माझ्या मनात सध्या कोणतेही नकारात्मक विचार नाहीत. मी केवळ देशाचा विचार करत आहे. काहीतरी बोलणं आणि करुन दाखवणं यामध्ये फरक आहे. मी फार वेळ बोलू शकतो पण जोपर्यंत मी काही करुन दाखवत नाही तोपर्यंत त्याला फारसा अर्थ असणार नाही," असंही शेखर सुमन म्हणाला. त्याने पक्षप्रवेशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले.


सध्या शेखर सुमन हिरामंडीमुळे चर्चेत


सध्या सोशल मीडियावर 'नेटफिक्स'वरील 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजची तुफान चर्चा आहे. या सिरीजमध्ये शेखर सुमनने नवाब नावाचं पात्र साकारलं असून सध्या या पात्रामुळेही शेखर सुमन चांगलाच चर्चेत आहे. 


राधिका खेरा यांनीही केला पक्षप्रवेश


काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक असलेल्या राधिका खेरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांचाही यावेळेस पक्षप्रवेश झाला. राधिका खेरा यांनी काँग्रेस सोडल्यानंतर अनेक गंभीर आरोप राहुल गांधी आणि काँग्रेसवर केले आहेत.