बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने (Kangna Ranaut) शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर रद्द करण्यात आलेले तिन्ही कृषी कायदे (Farm Laws) पुन्हा आणले जावेत असं विधान करत वादाला तोंड फोडलं होतं. यानंतर कंगना रणौतवर सर्व स्तरातून टीका झाली होती. भाजपाने कंगनाच्या विधानावर नाराजी जाहीर केली होती. यानंतर आता कंगना रणौत त्यावर व्यक्त झाली असून जाहीर माफी मागितली आहे. मी माझे शब्द मागे घेते असं तिने म्हटलं आहे. कंगनाने एक्सवर माफी मागणारा व्हिडीओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी भाजपाने कंगना रणौतच्या विधानापासून फारकत घेतली आणि कंगना पक्षाच्या वतीने अशी विधानं करण्यास अधिकृत व्यक्ती नसल्याचं सांगितलं होतं. पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी कंगनाचं विधान हे तिचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं होतं. व्हिडीओ मेसेजमध्ये ते म्हणाले की, "कंगना राणौतला भाजपच्या वतीने असे विधान करण्याचा अधिकार नाही आणि ते कृषी कायद्यांवर भाजपाचं मत दर्शवत नाही".


पक्षाने फटकारल्यानंतर कंगना रणौतने जाहीर माफी मागितली आहे. माझ्या विधानाने अनेकजण दुखावले असल्याचं ती म्हणाली आहे. "कृषी कायद्यांबद्दल माझे मत वैयक्तिक आहेत आणि ते त्या विधेयकांवरील पक्षाच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाहीत," असं तिने सांगितलं. 



"मी आता फक्त अभिनेत्री नाही तर एक राजकारणीदेखील आहे याचं मला स्वतःला स्मरण करून देण्याची गरज आहे, माझी मतं आता वैयक्तिक नाही तर पक्षाचं प्रतिबिंब दर्शवणारी असायला हवी," असं ती म्हणाली. कंगना रणौतने कृषी कायद्यांना सुरुवातीला मिळालेल्या व्यापक समर्थनाची नोंद केली, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते मागे घेण्याच्या निर्णयाचा आदर करण्याच्या महत्त्वावर जोर दिला.



"माझ्या मतांनी आणि शब्दांनी मी कोणाला निराश केलं असेल, तर मी त्याबद्दल दिलगीर आहे. मी माझे शब्द परत घेते," असं कंगना म्हणाली. तसंच पंतप्रधानांच्या निर्णयावर टिकून राहण्याची भाजपा सदस्यांची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. याआधीही कंगना रणौतने एक्सवर पोस्ट शेअर करत कृषी कायद्यांवरील माझं मत वैयक्तित असून, ती पक्षाची भूमिका नाही असं म्हटलं होतं. 


कंगनाने नेमकं काय म्हटलं होतं? 


कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "मला माहित आहे की हे विधान वादग्रस्त असू शकतं, परंतु तीन कृषी कायदे परत आणले पाहिजेत. शेतकऱ्यांनी स्वतःच याची मागणी केली पाहिजे." जर केंद्र सरकारने योग्य पावलं उचलली नसती तर देशात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण झाली असती असंही तिने म्हटलं होतं. 


तिने असा युक्तिवाद केला की हे तीन कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होते परंतु काही राज्यांमधील शेतकरी गटांनी केलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने ते रद्द केले. "शेतकरी हे देशाच्या विकासातील शक्तीचा आधारस्तंभ आहेत. मला त्यांना आवाहन करायचे आहे की त्यांनी स्वतःच्या भल्यासाठी कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी करावी," असंही ती म्हणाली होती.