अहमदाबाद: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभविप) होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इतिहासकार व लेखक रामचंद्र गुहा यांनी अहमदाबाद विद्यापीठात रुजू होण्यास नकार दिला आहे. त्यांनी गुरुवारी रात्री ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. काही घटनांमुळे परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली आहे. परिणामी मी अहमदाबाद विद्यापीठात रुजू होऊ शकत नाही. अहमदाबाद विद्यापीठाला उत्तम प्राध्यापक आणि कुलगुरू लाभले आहेत. भविष्यातील वाटचालीसाठी संस्थेला मी शुभेच्छा देतो. तसेच महात्मा गांधींजींच्या जन्मभूमीत असलेल्या या विद्यापीठात भविष्यात कधीतरी त्यांच्या विचारांचे चैतन्य पसरो, असे गुहांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबाद विद्यापीठातील मानवता व गांधी विंटर स्कूलच्या संचालकपदी रामचंद्र गुहा यांची नियुक्ती करण्याची घोषणा १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. मात्र, अभविपने गुहा यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. 


आम्हाला विद्यापीठात बुद्धिवादी हवेत, देशद्रोही आणि शहरी नक्षली नकोत, असे अभविपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यांनी गुहा यांच्या पुस्तकांमधील कथित देशद्रोही मजकूर विद्यापीठ प्रशासनापुढे सादर केला होता. तुम्ही ज्या व्यक्तीची नियुक्ती करत आहात तो कम्युनिस्ट विचारसरणीचा आहे. याशिवाय, त्यांची विचारसरणी हिंदूविरोधी आहे. त्यांच्या येण्याने विद्यापीठात जेएनयूसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे अभविपने सांगितले होते. 


यानंतर विद्यापीठा प्रशासनाने रामचंद्र गुहा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये गुहा यांनी विद्यापीठात रुजू न होण्याचा निर्णय घेतला.