डोक्याला गोळी लागल्याने तिने जगाचा निरोप घेतला, शरीराचे अवयव दान करून तिने इतिहास रचला.
हरिनारायण त्या निष्पाप मुलाचे वडील, तिचं नाव रॉली... आपल्या मुलीचे हसणे आठवून ते मात्र रडत आहेत. रॉलीने जग सोडले पण जाता जाता तिने अनेकांच्या आयुष्यात हास्य फुलवलं.
नवी दिल्ली : 27 एप्रिलची ती संध्याकाळ. रॉली नोएडा सेक्टर 121 मधील घराबाहेर खेळत होती. वडील हरिनारायण प्रजापती घरातील खोलीत होते तर आई पूनम घरगुती कामात व्यस्त होती. अचानक स्फोट झाल्याचा मोठा आवाज आला आणि पाठोपाठ रॉलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.
वडील हरिनारायण यांनी लगेच घराबाहेर धाव घेतली. त्यांना रॉली रक्ताने माखलेली दिसली. तिला घेऊन मग त्यांनी सरकारी रुग्णालय गाठले. नोएडाच्या सरकारी हॉस्पिटलने त्यांना दिल्लीतील एम्स हॉस्पिटल रेफर केले.
रात्री 11.30 च्या सुमारास रॉलीसह ते कुटुंब दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलला पोहोचले. रॉलीला ऍडमिट केल्यानंतर तिच्या डोक्याचे सीटी स्कॅन केले. त्यावेळी तिच्या डोक्यात गोळी लागून २ हाडे मोडल्याचे निष्पन्न झाले.
सलग दोन दिवस रॉलीवर उपचार करण्यात आले. तिची तपासणी करण्यात आली. परंतु, हे उपचार तोकडे पडले. शुक्रवारी सकाळी 11.40 वाजता रॉलीला ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात आले. यादरम्यान, रॉलीवर उपचार करणारे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. दीपक गुप्ता यांनी रॉलीच्या आई वडिलांना अवयवदानाबद्दल सांगितले.
ते काही वेळ भांबावले आणि नंतर काही वेळाने त्यांनी स्वतःच अवयवदानाला होकार दिला. नियमांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर अपोलोमध्ये दाखल झालेल्या एका मुलाच्या शरीरात रॉलीचे यकृत प्रत्यारोपित करण्यात आले. दोन्ही मूत्रपिंड एम्सच्याच एकाच रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले.
याशिवाय रॉलीच्या हृदयाची झडप आणि डोळ्यांचा कॉर्निया सुरक्षित ठेवण्यात आला आहे. यामुळे आणखी काही गरजूंचे प्राण वाचू शकणार आहेत. रॉलीचे वडील हरिनारायण प्रजापती यांच्या म्हणण्यानुसार, एम्स दिल्लीच्या इतिहासातील ती सर्वात तरुण अवयव दाता होती. जे भल्याना जमलं नाही ते या चिमुरडीने केलं. आमची आनंदी मुलगी जगातून निघून गेली. पण, जाता जाता तिने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.