कोलकत्ता : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सतत वाढत आहेत. कांद्याच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा दिसेनासा झाल्याचं चित्र आहे. संपूर्ण देशभरात एखाद्या वस्तूच्या खरेदीवर कांदा मोफत देण्याची ऑफर देण्याच्या अनेक ऑफर पाहायला मिळत आहेत. मोबाईल खरेदीवर असो किंवा जर कोणी हेल्मेट घातलं असेल, तर त्यालाही पेट्रोल पंपवर १ किलो कांदा मोफत... अशा आशयाच्या ऑफर देण्यात येत असल्याचं चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालमध्येही  (West Bengal) मच्छी विकणारे अशाच प्रकारची ऑफर देत आहेत. पश्चिम बंगालमधील पद्मा नदीतील हिलसा मासा अतिशय प्रसिद्ध आणि तितकाच तो महागही आहे. या हिलसा माश्याची किंमत जवळपास १३०० रुपये इतकी आहे. या माशाच्या खरेदीवर एक किलो कांदा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुकानाच्या बाहेर हिलसा माशाच्या खरेदीवर १ किलो कांदा मोफत अशी जाहिरात लावण्यात आली आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर मच्छी बाजारात लोकांची गर्दी वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अनेकांना मासे बनवताना त्यात कांदा लागतो. त्यामुळे मच्छीवर कांदा मोफत मिळत असल्याने लोकांची गर्दी वाढताना दिसतेय.


बंगाली लोकांना मासे खाण्याची खास आवड असते. त्यांच्यासाठी ही ऑफर फायद्याची ठरु शकते. दिवसाच्या अखेरीस कोलकातातील मासे व्यापारी बाबू, दोन ते तीन मासेच विकू शकत होते, मात्र आता, अशा प्रकारे कांद्याच्या ऑफरमुळे त्यांच्या माशांच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे.