`गरिबी हटाव` नंतर कर्जमाफी हा काँग्रेसचा नवा जुमला- मोदी
मोदींनी कर्जमाफीला लॉलीपॉप म्हटले होते.
चंदीगढ: काँग्रेसने अनेक वर्षे 'गरिबी हटाव'चा नारा देऊन देशातील जनतेची फसवणूक केली. यानंतर आता कर्जमाफी हा काँग्रेसचा नवा जुमला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते गुरुवारी पंजाबच्या गुरुदासपूर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर चौफेर टीका केली. त्यांनी म्हटले की, काँग्रेसने अनेक वर्षे 'गरिबी हटाव'सारख्या घोषणा देऊन लोकांची फसवणूक केली. आता त्यांनी लोकांना फसवण्यासाठी कर्जमाफी ही नवीन टुम काढली आहे, असे मोदींनी म्हटले.
काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये सत्तेत आलेल्या काँग्रेसने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. त्यावेळी मोदींनी कर्जमाफीला लॉलीपॉप म्हणून संबोधले होते. यानंतर पुन्हा एकदा मोदींनी काँग्रेसच्या कर्जमाफीच्या घोषणेचा समाचार घेतला.
यावेळी त्यांनी मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमल नाथ यांच्यावरही टीकास्त्र सोडले. कमल नाथ यांनी नववर्षानिमित्त मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात वंदे मातरम् गाण्याची प्रथा मोडीत काढली होती. जनतेने अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. यावेळी मोदी यांनी कमल नाथ यांच्या १९८४ साली झालेल्या शीख दंगलीतील सहभागावरही भाष्य केले. काँग्रेसने दंगलीचा आरोप असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवले. एका कुटुंबाच्या इशाऱ्यावर दंगलीतील आरोपांनी वाचवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, एनडीए सरकारने सत्तेत आल्यानंतर एसआयटी स्थापन करून पुन्हा या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्याचा निकालही समोर आला, असे मोदी यांनी सांगितले.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालंधरमध्ये विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन केले. ३ ते ७ जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील. भाजपाच्या 'मिशन २०१९' चा प्रारंभ या कार्यक्रमाने झाला. लोकसभा निवडणूकीची तारीख समजेपर्यंत पंतप्रधान मोदी २० राज्यांत एकूण १०० सभा घेणार आहेत.