Baba ka Dhaba : मोठ्या नुकसानीनंतर नवं हॉटेल बंद, कांता प्रसाद जुन्या ठिकाणी परतले
बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांचे नवीन रेस्टॉरंट फेब्रुवारी महिन्यात नुकसानीनंतर बंद झाले आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध झालेले बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांचे नवीन रेस्टॉरंट मोठ्या नुकसानीनंतर बंद झाले आहे. यानंतर ते पुन्हा आपल्या जुन्या जागी परतले आहेत आणि तिथे आता काम करत आहेत.
एका रात्रीत झाले प्रसिद्ध
गेल्या वर्षी, यूट्यूबर गौरव वासन (Gaurav Wasan) यांने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद आणि बदामी देवी हे लॉकडाऊनमध्ये कशाप्रकारे कठीण परिस्थितीत आहेत हे दाखवलं होतं. यानंतर त्यांचं नशिब बदलले होते आणि ढाब्यावर खाणाऱ्यांची संख्या वाढली. त्याशिवाय मोठ्या संख्येने लोक त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले.
उघडले होते नवीन हॉटेल
आर्थिक मदत मिळाल्यानंतर कांता प्रसाद यांनी जुना ढाबा बंद केला आणि दिल्लीतील मालवीय नगरमध्येच एक रेस्टॉरंट उघडले. नवीन रेस्टॉरंटमध्ये बाबांनी एक कुक आणि वेटर कामाला ठेवला. सुरक्षेसाठी रेस्टॉरंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावण्यात आले होते.
रेस्टॉरंट करावे लागले बंद
हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांचे नवीन रेस्टॉरंट फेब्रुवारी महिन्यात नुकसानीनंतर बंद झाले आहे. कांता प्रसाद यांनी रेस्टॉरंट उघडण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च केले होते. रेस्टॉरंटचा मासिक खर्च सुमारे 1 लाख रुपये होता, तर सरासरी मासिक विक्री 40,000 रुपयांपेक्षा जास्त नव्हती. कांता प्रसाद यांच्या खर्चामध्ये रेस्टॉरंटला भाडं हे 35000 रुपये, तीन कर्मचाऱ्यांचा पगार 36000 रुपये आणि रेशन, वीज आणि पाणी यासाठी 15,000 रुपये लागत होते. हळूहळू रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आणि रेस्टॉरंटचा खर्च वाढू लागला.
रेस्टॉरंट बंद केल्यानंतर कांता प्रसाद पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचले जिथे ते आधी धंदा करत होते. गेल्या वर्षी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबा का ढाबाच्या विक्रीत दहापट वाढ झाली होती आणि लोकं ढाब्यावर जेवणासाठी रांगेत उभे होते. पण आता त्यात मोठी घसरण झाली असून त्यांचं उत्पन्न ही कमी झालं आहे.
कौटुंबिक खर्च भागवणं कठीण
कांता प्रसाद म्हणाले की, 'दिल्लीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जुना ढाबा 17 दिवस बंद ठेवावा लागला. यामुळे विक्रीवर परिणाम झाला आणि लॉकडाउनपूर्वी जिथे दररोज विक्री 3500 रुपये होती, ती आता घसरून 1000 रुपयांवर आली आहे. आपल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी जे पुरेसे नाही.'