राफेल व्यवहार - अंबानी संबंधावर फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण
राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या दाव्याला बळ
नवी दिल्ली : फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा होलांद यांनी राफेल डीलबाबत धक्कादायक खुलासा केल्यानंतर फ्रान्स सरकारनं यावर अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिलीय. राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात दसॉल्ट एव्हिएशन कंपनीचा ऑफसेट भागीदार म्हणून भारताकडून रिलायन्सचे नाव सुचवण्यात आले होते, असा खुलासा फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा होलांद यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर, फ्रान्स सरकारनं प्रतिक्रिया देत, फ्रान्स सरकार कोणत्याही पद्धतीनं फ्रेंच कंपनीकडून निवडण्यात आलेली किंवा निवडत असलेल्या भारतीय भागीदाराच्या निवडीत सहभागी नाही. आमच्याकडे खाजगी कंपन्यांना पूर्ण हक्क आहे की ते ऑफसेटसाठी कोणत्याही स्थानिय भागीदार म्हणजेच भारतीय कंपनीची निवड करू शकतात... आणि भारतीय नियमांनुसार ही खात्री पटू शकेल की संबंधित कंपनीकडे करार पूर्ण करण्याची योग्यता आहे यासाठी हा करार मंजुरीसाठी भारत सरकारच्या समोर मांडू शकतात...
फ्रान्स्वा होलांद यांचा खुलासा
होलांद यांच्या या दाव्यामुळे राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या दाव्याला बळ मिळाले आहे. 'आम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. भारतीय सरकारने रिलायन्सचे नाव सुचविल्यानंतर 'द सॉल्ट' कंपनीने त्यांच्याशी बोलणी केली. याबाबती आम्हाला निवडीचा कोणताही अधिकारी नव्हता. भारताने सुचवलेल्या मध्यस्थाशी आम्ही करार केल्याचे फ्रान्स्वा होलांद यांनी म्हटलं होतं. एका फ्रेंच संकेतस्थळानं या संदर्भातील वृत्त प्रकाशित केलंय.
विरोधकांचा हल्लाबोल
होलांद यांच्या दाव्यानंतर ताबडतोब पत्रकार परिषद घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर तोफ डागली. पंतप्रधान मोदींनी जातीने चर्चा करून राफेल करारात बदल केले. हे सर्व बंद दरवाजाआड घडले. कर्जात बुडालेल्या अनिल अंबांनीच्या कंपनीचे नाव भारतीय सरकारनेच सुचवले होते, हे स्पष्ट केल्याबद्दल मी होलांद यांचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची फसवणूक केली आहे. त्यांनी जवानांच्या रक्ताचा अपमान केला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.