59 लाख लुटून त्या सगळ्या पैशांचा गावात मोठा भंडारा घातला; चोरांचा कारानामा पाहून पोलीस चक्रावले
56 लाखांची चोरी करुन चोरट्यांनी गाव जेवण घातले. संपूर्ण गावासह चोरट्यांच्या नातेवाईकांनी देखील या मेजवानीचा आस्वाद घेतला.
Uttar Pradesh Crime News : सास्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात लोकवर्गणीतून अथवा दानशूर व्यक्तीकडून भंडारा घातला जातो. उत्तर प्रदेशात मात्र, अजब घटना घडली आहे. चार चोरट्यांनी 59 लाख लुटून त्या सगळ्या पैशांचा गावात मोठा भंडारा घातला. तब्बल चार ते पाच दिवस गावात जेवणाच्या पंगती उठत होत्या. चोरांचा कारानामा पाहून पोलीस चक्रावले आहेत.
चोरांनी गावात घातला भंडारा
प्रतापगडच्या कुंडा भागातील नवाबगंज गावात मोठा भंडारा आयोजीत करण्यात आला. या भंडाऱ्यात फक्त गावातीलच नाही तर आसापासच्या गावातील लोक देखील जेवणाचा आस्वाद घेत होते. भंडाऱ्यासह नाच गाण्याचा देखील कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. चार दिवस गावात जत्रा भरल्यासारखे वातावरण होते. तब्बल चार ते पाच दिवस गावात जेवणाच्या पंगती उठत होत्या. या भंडाऱ्यात विविध पदार्थांची मेजवानी होती. चार चोरट्यांनी या भंड्याऱ्याचे आयोजन केले होते.
56 लाखांचा दरोडा
कानपूरमधील एका कार शोरूममध्ये चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी या शो रुममधून 59 लाखांचा ऐवज चोरून नेला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कानपूर पोलीस कसून या चोरट्यांचा शोध घेत होते. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढत त्यांना कुंडा येथून अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 28 लाखांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरलेल्या पैशातून आरोपींनी गावात मोठा भंडारा घातला होता.
चोरटे CCTV कमेऱ्यात कैद
4 जूनला रात्रीच्या सुमारास कानपूरच्या महाराजपूरमध्ये असलेल्या टोयोटाच्या शोरूममध्ये 59 लाख रुपयांची चोरी झाली होती. शोरूमची तिजोरी फोडून चोरट्यांनी ऐवज चोरून नेला होता. घटनेच्या वेळी शोरूमचे सुरक्षा कर्मचारीही ड्युटीवर होते. तरीदेखील चोरट्यांनी मोठा धडसी दरोडा टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी शोरूममध्ये 59 लाखांची चोरी झाल्याचे उघडकीस आले. यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली.
26 दिवसांनतर चोरट्यांना अटक
प्रतापगड येथून चोरट्यांना अटक करण्यात आली आली आहे. 26 दिवसांच्या तपासानंतर हे चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत. श्यामू मौर्य आणि संजीत अशी या अटक चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 28 लाखांची रोकड आणि 12 लाखांची एफडी जप्त केली आहे. या दोघांवर चोरीसह इतर गुन्ह्यांचे डझनभर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शो रुममधून 59 लाखांची चोरी केल्यानंतर गावात मोठा भंडारा घातल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.