मुंबई : काही दिवसांपूर्वी रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांना आर्थिक अडचणीत मोठी मदत केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांनी केलेल्या या मदतीमुळे अनिल यांचा तुरुंगवासही टळला होता. याचीच पुनरावृत्ती पुन्हा झाल्याचं पाहायला मिळत आहे. 'स्टील किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी त्यांच्या धाकट्या भावाला आर्थिक मदत करत त्यांना मोठ्या संकटातून बाहेर काढण्यास मोलाचा हातभार लावल्याचं म्हटलं जात आहे. पण, लक्ष्मी मित्तल यांच्या कंपनीकडून मात्र याविषयीची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील आणि देशातील नावाजलेल्या उद्योजकांमध्ये गणल्या जाणाऱ्या लक्ष्मी मित्तल यांनी भाऊ प्रमोद मित्तल यांच्या स्टेट कॉर्पोरेशन अर्थास एसटीसीचं थकलेलं कर्ज फेडण्यास मदत केली. मित्तल यांच्या या मदतीमुळे प्रमोद यांचा तुरुंगवास टळल्याचं कळत आहे. गेल्या साधारण आठवडाभरात घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे देशातील उद्योग आणि आर्थिक क्षेत्रात याविषयीच्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. 


ग्लोबल स्टील होल्डींगची मालकी असणाऱ्या प्रमोद कुमार मित्तल (५७) यांनी मोठ्या भावाकडून २ हजार २१० कोटी रकमेची थकबाकी फेडण्याकरता करण्यात आलेल्या मदतीसाठी मन:पूर्वक आभार मानले. 'एसटीचीचं कर्ज फेडण्यास मदत केल्याबद्दल मी लक्ष्मी मित्त, म्हणजेच माझ्या भावाचा आभारी आहे. त्यांच्या या निर्णयामुळे न्यायालयाच्या निर्देशांचं पालन झालं आहे', असं प्रमोद मित्तल म्हणाले. 


१९९४ मध्ये मित्तल बंधूंमध्ये असणाऱ्या औद्योगिक संबंधांमध्ये तफावत आली होती. ज्यानंतर हा उग्योग विभागला गेला होता. पुढे ज्येष्ठ बंधू लक्ष्मी मित्तल यांनी विश्वविख्यात आर्सेलर मित्तल या कंपनीची सर्व जबाबदारी स्वीकारली. पण, प्रमोद मित्तल यांच्या मालकीच्या ग्लोबल स्टीव होल्डींग्स आणि ग्लोबल स्टील फिलिपिंस इंक या कंपन्या मात्र स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी) ची थकबाकी रक्कम फेडण्यास असमर्थ ठरल्या आणि प्रमोद कुमार मित्तल हे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले.