प्रियांका गांधी राजकीय आखाड्यात आल्यानंतर कॉंग्रेसचे `मिशन 30`
कॉंग्रेस एकटी लढली तर याचा फायदा भाजपलाच होऊ शकतो.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकीआधी उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) आणि समाजवादी पार्टी ( एसपी) ने युती करत कॉंग्रेसला ठेंगा दाखवला आहे. अशावेळी कॉंग्रेसने सर्व 80 जागांवर या दोन्ही पक्षांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा विचार केला आहे. कॉंग्रेसच्या गोटात ठोस रणनिती बनवण्याच्या बैठकी सुरू आहेत. यासाठी कॉंग्रेसने 'मिशन 30' ची रणनिती आखली आहे. मिशन 30 म्हणजे अशा जागा जिथे कॉंग्रेसला मागच्या निवडणूकीत एक लाखाहून अधिक मतदान झाले होते. कॉंग्रेससाठी हे पाऊल जोखमीचे असू शकते. या अशा जागा आहेत जिथे सर्व दलांमध्ये मतांचे वाटप झाले तर याचा थेट फायदा भाजपला मिळणार आहे. 2014 मध्ये सहारनपुरच्या जागेवर कॉंग्रेसचे इम्रान मसूद 4 लाख मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. भाजपच्या उमेदरवाला इथे 4.77 लाख मतं मिळाली. तर बसपा आणि सपा यांना केवळ 3 लाख मतं मिळाली. अशामध्ये जर कॉंग्रेस एकटी लढली तर याचा फायदा भाजपलाच होऊ शकतो.
कागदांच्या गणितावर राजकारण होत नाही हे सत्य आहे. कॉंग्रेसने राजकीय आखाड्यात 'प्रियांका कार्ड' ची मोठी खेळी केली आहे. त्यामुळे सत्तेचे समीकरण बदलायला वेळही लागणार नाही असेही मानले जात आहे. 47 वर्षांच्या प्रियांका गांधी यांना योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली आहे. त्यांना इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध देखील निवडणूकीच्या रिंगणात लढावे लागणार आहे.
80 जागांवर लक्ष
'मिशन 30' हा आमच्या रणनितीचा भाग आहे. पण पार्टीचे लक्ष संपूर्ण 80 जागांवर असल्याचे कॉंग्रेसच्या एका नेत्याने 'न्यूज 18' ला सांगितले. 2009 च्या निवडणुकीत ज्या 21 जागांवर कॉंग्रेसला यश मिळाले होते त्या सर्व जागा 'मिशन 30' मध्ये येतात. पश्चिम सहारनपूर, गाझियाबाद आणि रामपूरच्या सर्व जागा यामध्ये येतात. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शिख मतांचा दबदबा आहे. गेल्यावेळेस काही जागांवर कॉंग्रेसला 20 हजारहून कमी मते मिळाली. त्यामुळे शिखांची मतं पारंपारिक रितीने आरएलडीला मिळाली नसल्याचे जाहीर आहे. या सर्वांत अनेकांनी भाजपवर विश्वास दाखवला. सहारनपुर, गाझियाबाद आणि रामपुरमध्ये मोठे नेता उभे केल्याचा कॉंग्रेसला फायदा झाला.