मुंबई : पुलवामा इथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने पाकिस्तानची मोठ्या प्रमाणात कोंडी केल्याचं उघड झालं आहे. नौदलानेच ट्वीटरद्वारे ही माहिती उघड केली आहे. 'ट्रॉपेक्स १९' या युद्ध सरावासाठी अरबी समुद्रात तैनात असलेल्या युद्धनौका भारतानं तातडीने पाकिस्तानच्या दिशेनं वळवल्या. आय एन एस विक्रमादित्य ही भारताची युद्धनौका तसंच 'आय एन एस चक्र' आणि 'आय एन एस अरिहंत' या भारताच्या पाणबुड्यांसोबतच इतरही युद्धनौका या मोहिमेवर पाठवण्यात आल्या. भारतीय नौदलाच्या तब्बल ६० हून अधिक युद्धनौकांनी पाकिस्तानच्या दिशेनं कूच केल्यामुळे, पाकिस्तानी नौदलाची चांगलीच कोंडी झाली. पाकिस्तानी नौदल 'माकारान' या किनारपट्टी भागातच अडकून पडलं होतं. खुल्या समुद्रात येण्याचं धारिष्ट्य पाकिस्तानी नौदलाला झालं नाही. ही माहिती स्वतः भारतीय नौदलानं आपल्या अधिकृत ट्वीटरवरून जाहीर केली आहे.


काय आहे 'ट्रॉपेक्स १९'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- 'थिएटरीकल लेव्हल रेडिनेस ऍन्ड ऑपरेशनल एक्सरसाईज' असं पूर्ण नाव आहे


- नौदल, वायुदल, लष्कर, कोस्टगार्ड यांचा युद्धसरावात सहभाग असतो


- दरवर्षी जानेवारी ते मार्चमध्ये तिन्ही दलांचा संयुक्त युद्धसराव  केला जातो


- २००५ पासून दरवर्षी केला जातोय युद्धसराव


माकारान किनारपट्टी नेमकी कुठे आहे?


- माकारान पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताची अरबी समुद्रालगतची किनारपट्टी आहे


- माकारान किनारपट्टीचा अर्धा भाग पाकिस्तानात, अर्धा भाग इराणमध्ये आहे 


- पाकिस्तानातील भागाला केच माकारान संबोधलं जातं


- माकारान किनारपट्टीवर पाकिस्तानचं सर्वात मोठं ग्वादार बंदर आहे


- ग्वादार हे चीनतर्फे विकसीत केलं जाणारं पाकिस्तानचं महत्त्वाचं बंदर आहे 


भारतीय नौदलाच्या या कृतीनं एका दगडात दोन पक्षी मारले गेले आहेत. भारतीय नौदलानं आपली क्षमता तर दाखवून दिलीच आहे, सोबतच पाकिस्तानलाही सज्जड इशारा दिला आहे.