नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील काँग्रेसच्या राजवटीवर असणारी टांगती तलवार आता दूर होण्याचे संकेत मिळाले आहेत. या राजकीय नाट्याच्या केंद्रस्थानी असलेले काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी सोमवारी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. या चर्चेनंतर सचिन पायलट यांनी बंडाची तलवार म्यान केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आज रात्रीच सचिन पायलट आपल्या समर्थक आमदारांसह जयपूरला रवाना होणार असल्याचे समजते. सचिन पायलट यांची पक्षश्रेष्ठींशी बोलणी करुन देण्यात महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राजीव सातव यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे समजते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांनी राहुल गांधींकडे सविस्तरपणे आपल्या तक्रारी मांडल्या. पायलट आणि राहुल यांच्यात स्पष्ट, खुली आणि निर्णायक चर्चा झाली. सचिन पायलट हे राजस्थानमध्ये काँग्रेस आणि कॉंग्रेस सरकारच्या हितासाठी काम करण्यास तयार आहेत, असे वेगणुगोपाल यांनी सांगितले. या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती सचिन पायलट आणि त्यांच्या गटातील आमदारांच्या समस्या जाणून घेईल. यानंतर पुढील कारवाई होईल, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 




येत्या १४ तारखेपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनापूर्वी सचिन पायलट यांचे बंड शमणे, हा काँग्रेससाठी मोठा दिलासा आहे. मात्र, आता सचिन पायलट परत आल्यानंतर अशोक गेहलोत यांच्याशी ते कशाप्रकारे जुळवून घेणार हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल. सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेसच्या हायकमांडने गेहलोत यांची बाजू उचलून धरली होती. यानंतर सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.