शशी थरुर यांचे `ते` ट्विट आणि भाजपचा संताप
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी गुरुवारी केलेल्या एका ट्विटवरून भाजपने संताप व्यक्त केला.
नवी दिल्ली - काँग्रेस नेते शशी थरुर यांनी गुरुवारी केलेल्या एका ट्विटवरून भाजपने संताप व्यक्त केला. शशी थरुर हिंदूत्त्वाचा अपमान करीत असून, देशाच्या पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीला बदनाम करण्याच्या काँग्रेसच्या कटाचाच हा एक भाग आहे, असे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थरुर यांचे ट्विट आणि त्यावरील प्रतिक्रिया हा मुद्दा चर्चेत राहणार हे निश्चित आहे.
शशी थरुर यांनी गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी हिंदी, हिंदू आणि हिंदुत्वाची भूमिका देशाचे विभाजन करीत आहे. आपल्याला एकतेची गरज आहे. एकसारखेपणाची नाही, असा आशय असलेले ट्विट केले होते. त्यावरून भाजपने संताप व्यक्त केला. या प्रकरणी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, शशी थरुर यांनी केलेले ट्विट अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यांचे ट्विट म्हणजे काँग्रेसची भूमिका आहे, असेच म्हटले पाहिजे. कारण शशी थरुर हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे लाडके आहेत. आतापर्यंत शशी थरुर यांनी जी वक्तव्ये केली आहेत, त्याचा काँग्रेसने पुरस्कारच केला आहे. काँग्रेसचा खरा चेहरा आता देशातील लोकांनी ओळखला आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना तडाखेबाज उत्तर देऊ, असे संबित पात्रा यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला भेट देऊन तिथे गंगा नदीत स्नान केल्यानंतरही शशी थरुर यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसच्या नेत्यांकडून हा प्रकार जाणीवपूर्वक केला जातो आहे. देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्याचा काँग्रेसचा कट आहे. आणि त्या कटाचाच एक भाग म्हणून काँग्रेसच्या नेत्यांकडून हिंदूत्त्वाची खिल्ली उडविण्यात येते आहे, असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे.
देशामध्ये फूट पाडणे हाच काँग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा असल्याची टीकाही भाजपकडून करण्यात आली आहे. त्यासाठीच शशी थरुर यांच्याकडून हिंदू तालिबान असा शब्दप्रयोग वापरण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे.