मुंबई : देशात ठिकठिकाणी झालेल्या लोकसभा / विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपची सरशी होण्याऐवजी पीछेहाट झाली आहे. यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पाच लोकसभा / विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक झाल्या. यातील महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या. जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा 18 हजार मतांनी पराभव केला.


बिहार राज्यातील बोचाहा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दल ( RJD ) उमेदवाराने भाजप उमेदवाराचा पराभव केलाय. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बोचहान विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलचे उमेदवार अमर पासवान यांनी भाजप उमेदवार बेबी कुमारी यांना पराभूत केलंय. अमर पासवान यांना 82,562 भाजपच्या बेबी कुमारी यांना 45909 अशी मते मिळाली आहेत.


पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 1.5 लाख मतांनी आघाडीवर आहेत. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे (TMC) अभिनेते शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. 


भाजपने त्यांना टक्कर देण्यासाठी बॉलिवूडमधील फॅशन डिझायनर अग्निमित्रा पॉल यांना मैदानात उतरवले होते. मात्र, या 'कांटे की टक्कर'मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी अग्निमित्रा पॉल यांना खामोश केलंय. 


पश्चिम बंगालमधीलच बालीगंज विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे बाबुल सुप्रियो यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या सायरा शाह हलीम यांचा पराभव केला. येथे भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला.


बालीगंज विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे बाबुल सुप्रियो यांना 51199 मते मिळाली. तर, त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या सायरा शाह हलीम यांना 30,971 मते मिळाली आहेत. तर, भाजपच्या केया घोष यांना 13220 इतक्या मतांवर सामान मानावे लागलंय.


छत्तीसगडमधील खैरागड विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसच्या यशोदा वर्मा यांनी भाजपच्या कोमल जांगेल यांचा २० हजार ६७ मतांनी पराभव केला. मात्र या निकालामुळे महत्चाच्या अशा पाचही निवडणुकांमध्ये भाजपचा एकही उमेदवार निवडून न आल्याने भाजपच्या गोटात चिंता पसरली आहे.