मुंबई : झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-जेएमएम आघाडीने बाजी मारली. झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी निवडणूक झाली. यात काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चानं (जेएमएम) भाजपला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते म्हणाले की, 'झारखंडच्या जनतेद्वारे मिळालेल्या जनादेशाचे आम्ही स्वागत करतो. भाजपला ५ वर्ष राज्यसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. भाजप राज्याच्या विकासासाठी कायम कटिबद्द राहील.' असे वक्तव्य त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले. 
 
झारखंड विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी आल्याने सत्तेतून पायउतार व्हाव्या लागणाऱ्या भाजपच्या जागाही दुपटीने घटल्या आहेत.  तर काँग्रेस, जेएमएमला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तब्बल ४७ जागांवर  पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.


या निवडणुकीत भाजपने एनआरसी, सुधारित नागरिकत्व कायदा, तिहेरी तलाक यासारखे राष्ट्रीय स्तरावरील मुद्यांवर भर दिला. तर काँग्रेस आघाडीने पाणी, जंगल, जमीन याच मुद्यावर भर दिला. याचा आदिवासी बहुल मतदार असलेल्या झारखंडमध्ये प्रभाव दिसून आला आणि भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे.