लॉकडाऊननंतर येथे सुरु झाली प्रथमच बससेवा
तब्बल ५५ दिवसांनी बससेवा सुरु करण्यात आली आहे.
बेळगाव : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आणि त्याचा फैलाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सार्वजनिक सेवा बंद आहेत. उद्योगधंदेही बंद आहेत. मात्र, असे असताना सगळे नियम पाळून तब्बल ५५ दिवसांनी बससेवा सुरु करण्यात आली आहे. बेळगावचे मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा गजबजल्याचे दिसून आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद करण्यात आलेली बस वाहतूक मंगळवारी सुरु करण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. या बससेवेला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला तरी बससेवा सुरु झाल्याने या काही लोकांना लाभ झाला. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानकातून पहिली बस ३० प्रवाशांना घेवून बेंगळुरुला रवाना झाली. बेळगावचे विभागीय नियंत्रक कक्षातन या बसला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही बस रवाना झाली.
आता आणखी काही मार्गावर बस सेवा सुरु करण्यात आली आहे. विजापूर, हुबळी, कारवार या भागातही बस सुरु करण्यात आल्या आहेत. परगावच्या बसबरोबरच शहरांतर्गतआणि ग्रामीण भागातील बससेवा सुरु करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. काल दिवसभरात २५२ फेऱ्या सुरु करण्यात आल्या. प्रत्येक बसचे सॅनिटेशन करण्यात आले होते. चालकांना मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर देण्यात आले होते. सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत या बसेस विविध मार्गांवर धावत होत्या.
दरम्यान, या प्रवासादरम्यान प्रवास करणाऱ्यांची माहितीही ठेवण्यात येत आहे. नाव आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी वाहकाकडून करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यामधून नागरिक येणार असल्याने आणि ते धोक्याचे असल्याने एखादा संशयित किंवा कोरोनाबाधित व्यक्तीने प्रवास केल्यास त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्यांची माहिती मिळाली, यासाठी तिकिट देण्यापूर्वी व्यक्तीचे नाव आणि मोबाईल क्रमांक घेण्यात येत आहे. ही माहिती प्रत्येक दिवशी डेपो मॅनेजरकडे जमा करण्यात येणार आहे.