लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका
५४ वर्षांचे अजय माकन यांनी दिल्ली विधानसभेत पक्षाने हार पत्करल्यानंतर दिल्लीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीला अवघे चार महिने राहिले असताना देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्येच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा अजय माकन यांनी राजीनामा दिला असून, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी तो स्वीकारला असल्याची माहिती मिळते आहे. अजय माकन हे काँग्रेस पक्षातील मोठे नेते आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अजय माकन यांनी गुरुवारी रात्री उशीरा राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. २०१५ मधील दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर दिल्ली काँग्रेसचा प्रमुख म्हणून मला पक्षातील कार्यकर्त्यांकडून, माध्यमांकडून आणि राहुल गांधी यांच्याकडून अपार प्रेम मिळाले. सध्याच्या परिस्थितीत हे सहजसाध्य निश्चितच नव्हते. मला केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, अशा आशयाचे ट्विट अजय माकन यांनी शुक्रवारी सकाळी केले.
५४ वर्षांचे अजय माकन यांनी दिल्ली विधानसभेत पक्षाने हार पत्करल्यानंतर दिल्लीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. अजय माकन यांच्यानंतर या महत्त्वाच्या पदावर पक्षाकडून कोणाला नियुक्त केले जाणार, याबद्दल आता चर्चांना सुरुवात झाली आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची या जागी नियुक्ती केली जाऊ शकते.