नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रियंका गांधी राजकारणातच सक्रिय झाल्या. सध्याच्या घडीला त्या आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. चार दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यात प्रियांका गांधी रविवारी लखनऊ येखील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसह बैठक घेतली. प्रदीर्घ काळासाठी घेण्यात येणाऱ्या या बैठकीत काही महत्त्वाच्या भूमिकांवर त्या दृष्टीक्षेप टाकणार असल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊ भेटीदरम्यान, त्या २०१७ मधील विधानसभा निवडणूकांच्या उमेदवारांचीही भेट घेणार असून, त्यांच्यासोबतही बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसची आगामी निवडणूकांसाठीची रणनिती आखण्यालाच प्रियंका गांधी प्राधान्य देणार आहेत. ज्यासाठी त्यांनी कार्यकर्यांना उद्देशून एक पत्रही लिहिलं आहे. 


प्रियंका यांनी लिहिलेल्या या पत्रात त्यांनी उत्तर प्रदेशशी असणाऱ्या आपल्या नात्याविषयी माहिती दिली. उत्तर प्रदेशमधील जनतेशी आपण फार पूर्वीपासूनच जोडलो गेल्याचं म्हणत त्यांनी सध्याच्या घडीला येथील जनता ही सरकारमुळे अनेक अडचणींचा सामना करत आहे, हा मुद्दा अधोरेखित केला. सोबतच उत्तर प्रदेशातील राजकारणाचं चित्र बदलण्याची जबाबदारी आपली असल्याचा निर्धार प्रियंका यांनी व्यक्त केला. 



असा असेल प्रियंका यांचा दौरा 


प्रियंका त्यांच्या या उत्तर प्रदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघातही पक्षाचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे याकडे साऱ्यांचच लक्ष लागलेलं आहे. प्रचारादरम्यान गंगाकिनारी असलेल्या विविध घाटांनाही त्या भेट देणार आहेत. या दौऱ्यातील काही प्रवास त्या मोटारबोटीतून करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मोटरबोटीतून वाराणसी यात्रा करण्यासाठी गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे परवानगीही मागितली आहे. होळीच्या उत्सवाआधी या प्रचाराच्या नौका यात्रेला सुरुवात होणार असून, यामध्ये त्या विविध संगमला भेट दिल्यानंतर वाराणासी भागात असणाऱ्या काही मंदिरांनाही भेट देणार असल्याचं कळत आहे.