भारतात तिसरी लाट धडक देऊ शकते, जर लोकांनी बाहेर फिरणं थांबवलं नाही - डॉ रणदीप गुलेरिया
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Doctor Randeep Guleria) यांनी सांगितले की, नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाउनचा सध्या कोणताही उपयोग होणार नाही.
दिल्ली : एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Doctor Randeep Guleria) यांनी सांगितले की, नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाउनचा सध्या कोणताही उपयोग होणार नाही. यासह त्यांनी असेही म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसर्या लाटेला भारताला सामना करावा लागू शकतो.
मीडिया अहवालानुसार डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, जर कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या अशीच वाढत राहिली तर, भारताला कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. जर विषाणूचा संसर्ग रोखायचा असेल तर, पुरेशा कालावधीसाठी लॉकडाउन लावणे आवश्यक आहे.
गुलेरिया म्हणाले, "कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी तीन गोष्टी पाहिल्या पाहिजेत. त्याम्हणजे रुग्णालयांची पायाभूत सुविधा सुधारणे, कोरोना संक्रमण रोखणे आणि लसीकरणाची गती वाढविणे. आपल्याला संक्रमणाची साखळी खंडीत करावी लागेल. जर आपण लोकांशी संपर्क कमी केला तरच कोरोनाची प्रकरणेही कमी होतील."
डॉक्टर गुलेरिया यांनी असे सांगितले आहे की, यावेळी शनिवार आणि रविवार असा विकेन्ड कर्फ्यू लावण्यास काहीच अर्थ नाही. पुरेशा कालावधीसाठी लॉकडाऊन लागू करणे आवश्यक आहे. जर विषाणूचा विकास होत राहिला तर, कोरोनाची तिसरी लाटही भारतात येऊ शकते. लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण लोकांना जितक्या लवकर कोरोना लस देऊ शकतो हे पाहाणे आवश्यक आहे. तसेच हा व्हायरस कसा बदलतो हे समजणे ही तितकेच महत्वाचे आहे.
दुसरीकडे, देशातील कोरोना साथीच्या आजाराविरूद्ध लढण्यासाठी लसीकरण प्रक्रिया देखील सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 15.89कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 12 राज्यातून 18 ते 44 वयोगटातील 4 लाख 6 हजार 339 लोकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. या 12 राज्यात छत्तीसगड (1,025), दिल्ली (40,028), गुजरात (1,08,191), हरियाणा (55,565), जम्मू-काश्मीर (5,587), कर्नाटक (2,353), महाराष्ट्र (73,714), ओडिशा (6,802), पंजाब (635), राजस्थान (76,151), तामिळनाडू (2,744) आणि उत्तर प्रदेश (33,544).