हैदराबाद महापालिका निवडणुकीत AIMIM किंगमेकर, भाजपला चांगले यश
ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत (Hyderabad Municipal Election) भाजपला (BJP) चांगले यश मिळाले. ४ जागांवरुन ४९ जागांवर विजय मिळवला आहे.
मुंबई : ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत (Hyderabad Municipal Election) भाजपला (BJP) चांगले यश मिळाले. ४ जागांवरुन ४९ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने या निवडणुकीत १४९ जागांवर निवडणूक लढविली होती. स्ट्राईक रेट ३२.३१ टक्के आहे. मात्र, या निवडणुकीत सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसला (TRS) चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांना मोठा फटका बसला आहे. ५५ जागा कशाबश्या पदरात पाडल्या. आधीच्या निवडणुकीत ९९ जागा जिंकल्या होत्या. तर -ओवैसी यांच्या AIMIM ५१ जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी ४४ जागांवर AIMIM विजय मिळवला आहे. त्यांचा स्ट्राइक रेट सर्वात जास्त ८६.२१ टक्के आहे.
हैदराबाद महापालिका निवडणुकीत एकूण १५० जागांवर तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ५५ जागांवर विजय मिळाला. सत्ताधारी टीआरएस हैदराबादमध्ये सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांना दुसऱ्या पक्षावर सत्तेसाठी अवलंबून राहावे लागेल. या निवडणुकीत निकाल त्रिशुंकू लागल्यानं हैदराबादमध्ये महापौर कोणत्या पक्षाचा होणार याकडे लक्ष लागले आहे.
भाजपने या निवडणुकीत जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तसेच दुसरीकडे, हैदराबादचे नाव 'भाग्यनगर' करण्याची घोषणा केली होती. त्याचा त्यांना फायदा झाल्याचे दिसून येत आहे. तेलंगणा राष्ट्र समितीला ३३ जागा गमवाव्या लागल्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला २०१६ च्या निवडणुकीच्या तुलनेत ४० टक्के कमी जागा मिळाल्यात.
२०१६ च्या हैदराबाद निवडणुकीत टीआरएसने तब्बल ९९ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. यावेळी भाजपला केवळ ४ तर असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाला ४४ जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. असे असले तरी MIMने आपल्या जागा कायम राखण्यात यश मिळवले आहे. हे यश मिळवताना तो सत्ता स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे, एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आता किंगमेकरच्या भूमिकेत दाखल झालेत.