...म्हणून अभिनंदन यांच्या अफाट बुद्धीमत्तेचे होतेय कौतुक
या सुचना जर पाकिस्तानला मिळाल्या असत्या तर भारताचे बऱ्याच अंशी नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानी लढाऊ विमानांचा पाठलाग करणारे भारतीय वायु सेनेचे विंग कमांडर अभिनंदन सध्या पाकच्या ताब्यात आहेत. त्यांनी स्वत:च्या बुद्धीमत्तेचा अद्भुत दाखला साऱ्या जगाला दिला. बुधवारी पाकिस्तानी लढाऊ विमानांचा पाठलाग करताना अभिनंदन यांचे मिग-21 पीओकेमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. पीओकेमध्ये पाकिस्तान्यांनी त्यांना घेरल्यानंतरही त्यांनी आपल्या बुद्धीमत्तेचा अद्भुत परिचय दिला. अभिनंदन यांच्याकडे भारतीय वायुसेनेशी संबंधित महत्त्वाची माहीती होती. या सुचना जर पाकिस्तानला मिळाल्या असत्या तर भारताचे बऱ्याच अंशी नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्वत: ला कठीण परिस्थितीत टाकून पाक विमानाच्या मागे अभिनंदन नियंत्रण रेषेच्या पलिकडे गेले. त्यांनी पुन्हा नियंत्रण रेषेजवळ येण्याचा प्रयत्न केला. पण एक वेळ अशी आली की आपण नियंत्रण रेषेपर्यंत पोहोचू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि ते पाकिस्तान्यांच्या तावडीत सापडले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकच्या स्थानिकांनी अभिनंदन यांना ते भारतातच उतरल्याचे भासवले. पण अभिनंदन यांना तो फरक ओळखण्यात वेळ लागला नाही की ते भारतात नसून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये आहेत.
हवेत गोळीबार करत अभिनंदन हे नियंत्रण रेषेच्या दिशेने जाऊ लागले. पण आपण एलओसी पर्यंत पोहोचू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले. पण पाकड्यांच्या हाती लागण्याआधी त्यांनी तलावात उडी मारली. आपल्याकडे भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीशी संबंधित गोपनीय कागदपत्रे आहेत याची त्यांना जाणिव होती. कोणत्याही प्रकारे ती कागदपत्रे पाकिस्तानच्या हाती लागू नयेत याची काळजी त्यांनी घेतली. म्हणून त्यांनी ती कागदपत्रे गिळण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. तलावामध्ये ती कागदपत्रे नष्ट करण्याचाही प्रयत्न अभिनंदन यांनी केला. या दरम्यान पाकिस्तानी सैनिक तिथे पोहोचले आणि अभिनंदन यांना त्यांनी स्वत:च्या ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
पाकिस्तानी लढाऊ विमानांनी बुधवारी जम्मू काश्मीरमधील भारतीय वायु सेनेच्या सीमेचे उल्लंघन केले आणि तिथल्या सैन्य दलाच्या ठिकाणांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय वायुसेनेने यांना जशासं तसे उत्तर दिले. मिग 21 ज्याचे पायलट अभिनंदन होते ते दुर्घटनाग्रस्त होण्याआधीच पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले गेले होते.