हाताला बांधून आणलं 1 कोटींचं सोनं! सोन्याची तस्करी करणाऱ्या Cabin Crew ला बेड्या
Gold Smuggling: कस्टमच्या अधिकाऱ्यांना या विमानामधून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली.
Air India Cabin Crew Gold Smuggling: सीमा शुल्क विभागाने कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kochi Airport) 1.4 किलो सोन्याची तस्करी करण्याच्या आरोपाखाली एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. हा कर्मचारी या कंपनीचा केबिन क्रू असून तो बहरीन-कोझिकोड- कोच्ची एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात कार्यरत होता. बुधवारी या कर्मचाऱ्याकडे सोनं सापडलं. त्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तरुणाला अटक केली.
कस्टम विभागाला केबिन क्रूकडे 1487 ग्राम सोनं सापडलं. केबिन क्रूने आपल्या युनीफॉर्मच्या आत स्लीव्हजमध्ये लपवून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. शफी शराफन असं वायनाडमध्ये राहणाऱ्या या तरुणाचं नाव आहे. त्याने आपल्या पांढऱ्या शर्टच्या स्लीव्हमध्ये हे सोनं लपवलं होतं. या व्यक्तीला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला कोच्ची एअरपोर्टवरील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
कस्टमच्या अधिकाऱ्यांना बहरीन-कोझिकोड-कोच्ची विमानातील एक केबिन क्रू सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. हातांवर सोनं लपेटून त्यावर आपला केबीन क्रूचा युनिफॉर्म घालून ग्रीन चॅनेलमधून म्हणजेच फार तपासणी केली जात नाही अशा प्रवेशद्वारांमधून विमानतळातून बाहेर पडण्याचा या तरुणाचा विचार होता. मात्र या तरुणाला यात यश आलं नाही. एएनआयने जारी केलेल्या फोटोंमध्ये शफी नावाच्या या तरुणाने सोनं आपल्या हातांवर गुंडाळल्याचं दिसत आहे. या सोन्याची किंमत अंदाजे 1 कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "अशाप्रकारच्या कृतीला एअर इंडिया एक्सप्रेस कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या अहवालानंतर या व्यक्तीला कामावरुन काढून टाकलं जाईल," असं एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या तरुणाची चौकशी सुरु असून यापूर्वी त्याने असा प्रकार केला आहे का याबद्दलचीही तपासणी केली जात आहे.