एअर इंडिया एक्स्प्रेसकडून मास बंक करणाऱ्या `त्या` कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; प्रवाशांसाठी घेतला `हा` निर्णय
Air India Express Flights : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मास बंक करत कामावर दांडी मारली आणि कंपनीचं वेळापत्रक एका क्षणात कोलमडलं. आता कंपनीनंच केलीय धडक कारवाई...
Air India Express Flights : एअर इंडिया एक्सप्रेस च्या जवळपास 200 कर्मचाऱ्यांनी अचानक Sick leave चं कारण देत सुट्टी घेतली आणि एकाच दिवशी, एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी रजा घेतल्यामुळं विमानसेवा पुरवणाऱ्या या कंपनीचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलं. जवळपास 70 उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय कंपनीला तडकाफडकी घ्यावा लागला. वरिष्ठ क्रू मेंबर्सच्या या एका पावलामुळं कंपनीचं नुकसान झालंच पण, त्यासोबत प्रवाशांनासुद्धा मनस्ताप झाला.
एकंदर प्रवाशांच्या मनात कंपनीच्या सेवेबाबतच्या विश्वासार्हतेवरही याचा परिणाम झाला, ज्यामुळं आता Air Indian Express कडून जवळपास 25 कर्मचाऱ्यांना तातडीनं बडतर्फ करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये Air Indian Express च्या प्रवाशांना या अस्थिर वातावरणाचा पटका बसणार असं दिसत असतानाच कंपनीच्या या धडक कारवाईनं कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे.
गटबाजी करत सेवा विस्कळीत करणं आणि नियुक्तीच्या अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत एअर इंडिया एक्स्प्रेसनं त्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं. दरम्यान या सर्व वातावरणाचा प्रवाशांना आणखी फटका बसू नये यासाठी कंपनीनं आणखी एक मोठा निर्णय घेत विमानसेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी कमीत कमी उड्डाणं रद्द करण्यावर भर दिला आहे.
हेसुद्धा वाचा : Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!
दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी आज टाऊन हॉल मीटिंग बोलावली असून या माध्यमातून आपल्या समस्या उघडपणे मांडण्यासंबंधीच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा विचार करुन कर्मचाऱ्यांनी नोकरीवर रुजू व्हावं असा इशाराही कंपनीकडून देण्यात आला आहे.