मुंबई : भारत सरकारची अधिकृत विमान कंपनी एअर इंडियाचा वाढता तोटा लक्षात घेता, सरकारनं ही विमान कंपनी विकण्याची तयारी सुरू केलीय. त्याच पार्श्वभूमीवर आता एअर इंडियामधली हिस्सेदारी विकत घेण्यासाठी टाटा समूह पुढे आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भात टाटा समूहाशी चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एअर इंडियाला दरवर्षी हजारो कोटींचा तोटा होत असून सध्या कंपनीवर जवळपास ३५ हजार कोटींचं कर्ज आहे. त्यामुळे  सरकारी विमानसेवा पोसणं कठीण होऊन बसलंय.


नीती आयोगाचा अहवाल


याविषयी नीती आयोगानं तयार केलेल्या अहवाल ही विमानसेवा बंद करणे किंवा ती खाजगी विमान कंपन्यांना विकणे असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. 


या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे एअर इंडिया विकण्याविषयी हालचाली सुरू केल्या आहेत. कंपनी पूर्णपणे खाजगी हातात देण्यास नागरी हवाई वाहतूक खात्याची पूर्ण सहमती अद्याप मिळालेली नाही. 


पण अशी आजारी कंपनी खाजगी कंपन्यातरी विकत घेण्यास उत्सुक आहेत का? याविषयीची पडताळणी सरकारनं सुरू केलीय. त्यात टाटा समूहानं एअर इंडियाविषयी उत्सुकता दर्शवली आहे.


टाटा ते टाटा


विशेष म्हणजे भारतात विमान सेवा सुरू करण्याचा मान टाटा समूहाकडेच आहे. जेआरडी टाटा यांनी सुरू केलेली विमानसेवाच पुढे सरकारनं ताब्यात घेऊन तिचं सरकारी विमानसेवेत रुपांतर केलं होतं. त्यामुळे जर एअर इंडियाचं खाजगीकरण झालं, आणि कंपनी टाटा समूहाच्या हाती गेली, तर एक व्यावसायिक वर्तुळ पूर्ण होणार आहे...