COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर एअर इंडियाने (Air India ) कुवेत आणि इटलीला जाणारी विमानांची उड्डाणे ३० एप्रिलपर्यंत रद्द केली आहेत. त्याचप्रमाणे दक्षिण कोरिआ, फ्रान्स, जर्मनी, इस्राईल आणि श्रीलंकेला जाणाऱ्या विमानांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. दरम्यान, याआधी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी एअर इंडियाने २८ मार्चपर्यंत इटलीला जाणारी सर्व विमाने रद्द केली होती. तसेच त्याचबरोबर एअर इंडियाने दक्षिण कोरियाला जाणारी विमाने देखील २५ मार्चपर्यंत रद्द केली होती. आता यामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत या विमानांच्या उड्डाणांमध्ये एअर इंडियाने कपात केली आहे. 


भारतात परतलेले १४ दिवासांसाठी वेगळे 



दरम्यान, काल एअर इंडियाच्या विमानाने मिलान इथून आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरु आहेत. विमानातले कर्मचारी आणि पायलट यांनाही १४ दिवासांसाठी वेगळे ठेवण्यात आले आहे. तसेच इराणमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या ४४ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत पोहचले. या विमानातून आलेल्या सर्व भारतीय नागरिकांना घाटकोपर इथल्या राजावाडी रुग्णालयात १४ दिवस, स्वतंत्र कक्षात, वैद्यकीय देखरेखी खाली ठेवले आहे. हे सर्व भारतीय कोरोना विषाणूच्या तपासणीत बाधित नसल्याचे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी सांगितलं आहे. 


देशात कोरोनाचे पाच नवे रुग्ण 


देशात कोरोना या आजाराचे ५ नवे रुग्ण काल आढळून आले. त्यामुळे या आजाराने बाधित झालेल्या देशातल्या रुग्णांची संख्या ८१ वर पोहोचली आहे. यापैकी ६४ रुग्ण भारतीय, १६ इटलीचे आणि १ कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. सर्व रुग्णांची तब्येत स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. 


देशातल्या २ हजार ५५९ व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली आहेत तर १७ विदेशी नागरिकांसह ५२२ व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाबाधित देशातून १०३१ प्रवाशांना देशात परत आणल्याचेही अग्रवाल म्हणाले.